breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

#CoronaVirus: जालन्यात आठवा मृत्यू, १४५ कोरोनामुक्त

नवीन सात रुग्ण आढळल्यामुळे जालना जिल्ह्य़ातील करोनाबाधितांची संख्या २५५ झाली आहे. यापैकी १४५ रुग्ण करोनामुक्त झालेले आहेत. शुक्रवारी पहाटे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्य़ात करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या आठ  झाली आहे. गुरुवारी रात्री आढळलेल्या सात करोनाबाधितांपैकी पाच अंबडमधील, तर दोन जालना शहरातील आहेत.

जिल्ह्य़ात आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या आठ रुग्णांपैकी सात मृत्यू जून महिन्यात झालेले आहेत. त्यामध्ये जालना शहरातील तीन व्यक्तींचा समावेश आहे. करोनाबाधित आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील आणि सहवासातील ६ हजार ६२८ व्यक्तींचा शोध आतापर्यंत आरोग्य यंत्रणेने जिल्ह्य़ात घेतलेला आहे. आतापर्यंत जवळपास ३ हजार २०० व्यक्तींच्या नमुन्यांचा अहवाल नकारात्मक आलेला आहे.

जून महिन्यातील बारा दिवसात एका दिवसाचा अपवाद वगळता दररोज करोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत. जूनमधील बारा दिवसात आढळून आलेल्या एकूण ११४ रुग्णांमधील ७७ व्यक्ती नागरी भागातील आहेत. जालना शहरासह अंबड, जाफराबाद, बदनापूर या तालुक्याच्या ठिकाणी करोनाचे रुग्ण आढळलेले आहेत. जिल्ह्य़ातील आठही तालुक्यांमध्ये करोनाचे रुग्ण आढळलेले आहेत. जालना शहरातील मोदीखाना, लक्ष्मीनारायणपुरा, कादराबाद, गडलागल्ली, गांधीनगर, व्यंकटेशनगर, मंगळबाजार, बालाजनगर इत्यादी अनेक भागांमध्ये करोनाचे रुग्ण आढळून आलेले आहेत.

आठही तालुक्यांत करोना काळजी केंद्रे

जिल्ह्य़ात एप्रिल महिन्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या अत्यंत कमी होती. परंतु राज्यातील अन्य जिल्ह्य़ांमधून तर बाहेरच्या राज्यांमधून आलेल्या व्यक्तींमुळे करोनाचे रुग्ण वाढले. जिल्ह्य़ातील प्रत्येक तालुक्यात करोना काळजी केंद्रे उभारण्यात आलेले असून तेथे १ हजार ७०० खाटा उपलब्ध आहेत. जालना शहरातील तीन खासगी रुग्णालये त्याचप्रमाणे आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आणि वरुडी येथील रुग्णालयात करोना उपचारासाठी खाटा आरक्षित करण्यात आलेल्या आहेत. करोना विषाणू संसर्गाच्या चाचणीची स्थानिक प्रयोगशाळा कार्यान्वित करण्याचे प्रयत्न आहेत. जालना येथे स्वतंत्र दोनशे खाटांचे उपचार रुग्णालय कार्यान्वित झालेले आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button