breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संविधानाचा राग पोटातून ओठावर आला – आ. ह. साळुंखे

सांगली – आतापर्यंत प्रतिगामी विचारसारणीच्या पोटात असलेला संविधानाविषयीचा राग आता उघडपणे ओठावर आला आहे. समाजात सर्वत्र अंधारुन आल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. तरुण मनूवादी विचारांच्या प्रभावाखाली जात आहेत. संविधान धोक्यात आले असल्याची खंत व्यक्त करुन या बिकट परिस्थितीत समाजात पुरोगामी विचारांचे बीज रुजविणे अत्यंत गरजेचे असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी कवठेएकंद (ता. तासगाव) येथे केले.

परिवर्तन परिक्रमा सामाजिक संस्था, कवठेएकंद ग्रामपंचायत, सिध्दराज पाणीपुरवठा संस्था नंबर एक आणी दोन यांच्यावतीने डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या हस्ते आमदार गणपतराव देशमुख यांना ताम्रपट प्रदान करुन सन्मान करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

साळुंखे म्हणाले, समाज सत्यशोधकी चळवळ विसरला आहे. चळवळ उभी करणार्‍यांचे वारसदार सत्यनारायण पूजा घालू लागले आहेत. यामुळे बहुजनांनी उभा केलेल्या चळवळी फसत आहेत. इतिहासातील आदर्शांचे चरित्र पुढच्या पिढीपर्यंत न पोहोचल्याने हे घडत आहे.

आमदार गणपतराव देशमुख यांचा गौरव म्हणजे वारकऱ्यांनी विठोबाची मनोभावे केलेली पूजा आहे. पक्ष बदलाच्या राजकारणात विकास व समाज हितापेक्षा व्यक्तीगत फायद्यावर जास्त ठेवली जाते. या विचित्र परिस्थितीत तत्वापासून एक क्षणही विचलित न होता आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता गणपतराव देशमुख यांनी स्वत:चे आयुष्य गोरगरीबांच्या भल्यासाठी खर्ची घातले. हा ताम्रपट प्रदान सोहळा आपल्या सामाजिक स्वार्थासाठी आहे. भावी पिढीसमोर गणपतराव देशमुख यांच्या रुपाने एक आदर्श चरित्र उभा राहणार असल्याचे डॉ. साळुंखे यांनी सांगितले.

सत्काराला उत्तर देताना आमदार गणपतराव देशमुख म्हणाले, हा सत्कार माझा नसून गेली सलग ५५ वर्षे माझ्यावर अविरतपणे प्रेम करणार्‍या सांगोला तालुक्यातील जनतेचा आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत दुष्काळी भागातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी लढत राहीन.

यावेळी विद्रोही सांस्कृतिक चळवळ सातारा यांच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी गौतम काटकर लिखीत एकलव्याचा अंगठा हे पथनाट्य व या देशाला जिजाऊ चा शिवाजी पाहिजे हे स्फूर्ती गीत सादर केले. महिला शाहीर शितल साठे यांनी संपविला देह जरी संपणार नाही मती हा पोवाडा सादर केला.

स्वागत डॉ. बाबूराव गुरव यांनी केले. प्राध्यापक बाबुराव लगारे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन तानाजी जाधव यांनी केले. माजी आमदार शरद पाटील, संपतराव पवार -पाटील, वैभव नायकवडी, अरुण लाड, चंद्रकांत देशमुख, वि. स. महाजन, सरपंच राजश्री पावसे, माधवराव मोहिते, अॅड. कृष्णा पाटील, अॅड. के. डी. शिंदे, अॅड. अजित सूर्यवंशी, नामदेवराव करगणे, संतोष आठवले, प्रा. वैजनाथ महाजन, ग्रामस्थ आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button