breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

#CoronaVirus: आमदार रोहित पवारांकडून ३६ जिल्ह्यांना मदतीला हात

प्रत्येक जण आपापल्या परीने करोना व्हायरसशी लढा देत असताना आता आमदार रोहित पवार यांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. कर्जत-जामखेडचे आमदार असलेल्या रोहित पवार यांनी गेल्या काही दिवसांमध्ये राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमध्ये ४० हजार लीटरपेक्षा जास्त सॅनिटायझरचा पुरवठा केला आहे. त्यासाठी बारामती अॅग्रोची मदत त्यांनी घेतली आहे. विशेष म्हणजे हे सॅनिटायझर रोहित पवार मोफत पुरवत आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून काही दिवसांमध्येच बाजारात सॅनिटायझर्सचा तुटवडा भेडसावू लागला. तसंच अनेक ठिकाणी सॅनियाटझर्सचा काळाबाजारही सुरू झाला. सॅनिटायझरची वाढती गरज, उपयुक्तता आणि त्यांचा असलेला तुटवडा लक्षात घेऊन आमदार रोहित पवार पुढे सरसावले. त्यांनी फक्त कर्जत-जामखेड या आपल्या मतदारसंघातच नाही, तर संपूर्ण राज्यात सॅनिटायझरचा पुरवठा करण्याची योजना आखली.

ही योजना पूर्ण करण्यासाठी कर्जत जामखेड एकात्मिक संस्था आणि बारामती ॲग्रो यांच्या संयुक्त विद्यमाने काम सुरू झालं. या संस्थांमार्फत आतापर्यंत राज्यातल्या ३६ जिल्ह्यांमध्ये सरकारी रुग्णालये, पोलीस स्टेशन, वैद्यकीय संस्था, धार्मिक संस्था, सरकारी कार्यालये या ठिकाणी तब्बल ४० हजार लीटर सॅनिटायझरचा पुरवठा केला आहे. यामध्ये शहरी आणि ग्रामीण असा कोणताही भेदभाव करण्यात आलेला नाही.

सध्याच्या काळात लोकांनी एकत्र येऊन एकमेकांना धीर देण्याची गरज आहे. सॅनिटायझरसारखी महत्त्वाची गोष्ट राज्याच्या एका कोपऱ्यात उपलब्ध आहे आणि दुसऱ्या कोपऱ्यात ती मिळत नाही, ही विषमता मला न पटणारी आहे. ती दूर करण्याच्या विचारातूनच हा उपक्रम सुचला, असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं.

पाच लीटरच्या कॅनमधून या सॅनिटायझरचा पुरवठा केला जातो. सॅनिटायझर तयार करून ती कॅनमध्ये भरून राज्यभरात वितरित करण्याचं काम आमच्या संस्थेकडूनच केलं जातं. राज्याच्या कानाकोपऱ्यातील सरकारी, वैद्यकीय आणि धार्मिक संस्थांमध्ये येणाऱ्या प्रत्येकाला ती उपलब्ध व्हावी, हाच आमचा प्रयत्न आहे, असंही रोहित पवार यांनी सांगितलं. सॅनिटायझरबरोबरच मास्क आणि संसर्गाला प्रतिबंध करणारे चष्मे यांचं उत्पादनही या संस्थांमार्फत केलं जात असून या गोष्टी वैद्यकीय संस्था, रुग्णालयं इथे पोहोचवल्या जात आहेत.

आतापर्यंत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, सांगली, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, बारामती अशा अनेक जिल्ह्यांमध्ये सॅनिटायझरचं वाटप झालं आहे. एकट्या मुंबईतच चार हजार लीटरपेक्षा जास्त सॅनिटायझरचा पुरवठा करण्यात आला आहे. या कामी माझ्या कार्यकर्त्यांबरोबरच समाजातल्या सगळ्याच स्तरातल्या लोकांची खूप मदत होत आहे. हे काम एकट्याचं नाही, ते सगळ्यांचंच आहे. त्यामुळे त्या सर्वांचाही या कामात सहभाग आहे, ही जाणीव मला आहे, असंही पवार म्हणाले.

पवार साहेबांनी त्यांच्या कृतीतून आम्हाला नेहमीच ही शिकवण दिली आहे की, लोकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं. संकटकाळात त्यांना मदतीचा हात द्यायचा. आज त्यांच्या वाटेने चालण्याचा प्रयत्न करताना संपूर्ण मानवजातीवर आलेल्या संकटाच्या या काळात मी थोडी जरी मदत करू शकलो, तरी पवार साहेबांच्या शिकवणीचंच चीज झालं, असं म्हणेन, या शब्दात रोहित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button