कंत्राटी कर्मचा-यांने मारला डल्ला : बोगस पावतीद्वारे रुग्णांच्या नातेवाईकांकडून ‘वसुली’
पिंपरी-चिंचवडमधील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील प्रकार

पिंपरी : पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील अत्यावश्यक विभागाच्या ‘कॅश काउंटर’ वर बोगस पावतीद्वारे लाखो रुपयाची रक्कम कंत्राटी कर्मचा-याने हडप केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाईकांनी भरलेल्या रोख रक्कमेवर डल्ला मारत त्यांना बोगस पावत्या दिल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. त्यामुळे वायसीएम रुग्णालय प्रशासनाने सदरील ‘कॅश काउंटर’ तात्काळ बंद करुन त्या कंत्राटी कर्मचा-याची इतरत्र बदली केली आहे.
महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील ओपीडी बंद झाल्यानंतर अत्यावश्यक विभागाचे कॅश काउंटर सुरु असते. रुग्णालयातील 44 नंबरच्या एक ‘कॅश काउंटर’ वर दुपारनंतर नातेवाईकांची सतत वर्दळ असते. दररोज हजारो रुपयाच्या पावत्याद्वारे रोख रक्कम रुग्णालयात जमा होत होती. मात्र, कंत्राटी कर्मचा-याने शक्कल लढवून बोगस पावत्या बनवून ‘वायसीएम’च्या लाखो रुपयाच्या रकमेवर डल्ला मारला आहे.
सदरील कंत्राटी कर्मचारी हा बीव्हीजी ठेकेदार कंपनीकडे कामाला आहे. गेल्या दहा महिन्यापासून रुग्णालयात जमा होणारी रोख रक्कम तो कर्मचारी हडप करत होता. दुपारी दोन ते रात्री दहा वेळेत रुग्णालयातील कॅश काउंटरवर तो काम करत होता. विशेष म्हणजे रुग्णाच्या नातेवाईकांनी रक्त, प्लेटलेट खरेदी संर्दभात दररोज तीन ते नऊ हजार रुपयाच्या पावत्या त्या काऊंटर वर केल्या जात होत्या. गेल्या दहा महिन्यात लाखो रुपयाच्या बोगस पावत्याद्वारे रुग्णालयाच्या रकमेवर त्या कर्मचा-याने डल्ला मारल्याचे दिसून येत आहे.
सदरचे ‘कॅश काउंटर’ तात्काळ बंद केले आहे. त्या कंत्राटी कर्मचा-याची इतरत्र वाॅर्डमध्ये बदली केली आहे. जानेवारीपासून त्याने केलेल्या सर्व पावत्याची माहिती घेतली जात आहे. प्राथमिक तपासात तफावत आढळून येत आहे. सदरील प्रकाराची गांभिर्याने दखल घेतली असून रुग्णालय प्रशासनाकडून चौकशी सुरु केली आहे.
– डाॅ. राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय.