breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

राष्ट्रवादीकडून भामा आसखेड प्रकल्प ‘विसर्जित’ करण्याचे कारस्थान : एकनाथ पवार

‘जॅकवेल’च्या कामावरुन राष्ट्रवादीवर जहरी टीका
पिंपरी : पिंपरी-चिंचवडकरांच्या हक्काचे पाणी अडवणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे पवना बंदीस्त जलवाहिनी प्रकल्पासाठी रक्ताचे पाट वाहिले. तरीही शहराला एक थेंब पाणी मिळाले नाही. आता भामा आसखेड प्रकल्पाचे पाणी मिळवण्यासाठी सुरू होणाऱ्या जॅकेवेलच्या कामाला खोडा घालण्याचे पाप राष्ट्रवादी करीत आहे. भ्रष्टाचाराचा आरोप करीत भाजपाच्या नेत्यांना बदनाम करण्याचा घाट घातला जात आहे. या कामात भ्रष्टाचार झाला असेल किंवा भाजपा नेत्यांचा सहभाग असल्याचे सिद्ध करावे, तर राजकारणातून सन्यास घेईल, असे आव्हान भाजपाचे प्रदेश प्रवक्ते एकनाथ पवार यांनी दिले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून भामा आसखेड धरणातून पाणी मिळवण्यासाठी ‘जॅकवेल’ उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. या निविदा प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थानिक नेत्यांनी महापालिका अधिकाऱ्यांना घेराओ घातला. तसेच, या प्रकरणात भाजपाचा नेत्यांचा हस्तपेक्ष असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला. याला एकनाथ पवार यांनी प्रत्त्यूत्तर दिले आहे.
एकनाथ पवार म्हणाले की, जॅकवेलच्या कामाची निविदा २०२१ मध्ये प्रसिद्ध झाली. त्या निविदेला प्रतिसाद मिळाला नाही म्हणून दोनदा मुदतवाढ देण्यात आली. दोन कंपन्यांनी निविदा भरली. त्यातील एक अपात्र झाली. निविदा स्वीकृती रकमेपेक्षा जास्त दराने निविदा भरणाऱ्या ठेकेदार कंपनीला प्रशासनाने २ वेळा पत्र पाठवून दर कमी करण्याबाबत सूचना केली. त्यानुसार कंपनीने १७ कोटी रुपये कमी करण्याची भूमिका घेतली. प्रशासनाने पिंपरी-चिंचवडकरांच्या करातून खर्च होणारे १७ कोटी रुपये वाचवले. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी प्रशासनाचे अभिनंदन करणे अपेक्षीत होते. मात्र, तसे न करता निविदा प्रक्रियाच रद्द करण्याची मागणी करीत प्रकल्पाला खोडा घालून पिंपरी-चिंचवडकरांचे पाणी थांबवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
वास्तविक, महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात आणि स्वत:च्या मर्जीतील आयुक्त असताना राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना शहर विकासाच्या दृष्टीने एकाही मोठा प्रकल्प राबवता आला नाही. याउलट, भाजपाच्या काळात राबवलेल्या प्रकल्पांचा निधी कमी करणे, निविदा रद्द करणे किंवा कामच बंद करणे अशी कारस्थाने केली. आता सेना-भाजपा महायुतीची सत्ता राज्यात आहे. त्याचा मदतीने लोकांच्या अपेक्षांचा विचार करुन आणि महाविकास आघाडीच्या काळातील रखडलेले सकारात्मक प्रकल्प मार्गी लागत आहेत. त्याचा दूरगामी फायदा पिंपरी-चिंचवडकरांना होणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपा महाविकास आघाडीला डोईजड होत आहे. याचा राष्ट्रवादीला पोटशूळ उठला असावा, असा शाब्दिक हल्लाही एकनाथ पवार यांनी केला आहे.
अपात्र ठेकेदारला काम देण्यासाठी जळपळाट?

‘जॅकवेल’च्या कामात दोन कंपन्यांनी निविदा भरली. त्यातील पात्र ठरलेली निविदाधारक कंपनीला महाविकास आघाडीच्या काळात मुंबई आणि पुणे येथील शेकडो कोटी रुपयांची कामे दिल्याचे निदर्शनास आले आहेत. संबंधित कंपनीवर आक्षेप घेणाऱ्या राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना दुसऱ्या कंपनीला काम मिळावे, अशी अपेक्षा होती. अपेक्षा भंग झाल्यामुळेच राष्ट्रवादीच्या नेत्यांना निविदा राबवल्यानंतर तीन महिन्यांनी जाग आली. प्रशासनाला वेठीस धरुन ठेकेदार कंपनीवर दबाव आणण्याचा हा प्रकार आहे. महापालिका भवनात येवून संबंधित अधिकाऱ्यांना घेराओ घालणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादीतील व्यावसायिक नेत्यांचा भरणा मोठा होता. या व्यासायिक नेत्यांनी निविदा प्रक्रियेत सहभाग घेतला असता, तर आणखी स्पर्धा झाली असती. आता तीन महिन्यांनी जाग आलेल्या ‘त्या’ नेत्यांनी प्रशासकीय कार्यपद्धती जाणून घेतली पाहिजे. २५ वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीने पवना जलवाहिनी प्रकल्प मार्गी पाण्यात घातला. आता भामा आसखेड प्रकल्पाला खोडा घालून ‘‘विसर्जित’’ करण्याची मानसिकता राष्ट्रवादीच्या नेत्यांची आहे, असा घणाघातही एकनाथ पवार यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button