breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने पुण्याच्या पालकमंत्रिपदावर दावा सांगितल्यामुळे चंद्रकांत पाटलांची खुर्ची धोक्यात?

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर राज्य मंत्रिमंडळात समावेश झालेल्या वरिष्ठ मंत्र्यांमुळे पूर्वीच्या अनेक मंत्र्यांची चांगलीच पंचाईत होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाने पुण्याच्या पालकमंत्रिपदावर दावा सांगितला आहे. त्यामुळे विद्यमान पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे काय होणार, असा प्रश्न उभा ठाकला आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली अनेक आमदारांनी महायुती सरकारमध्ये प्रवेश केला. पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आदी मंत्र्यांचा शपथविधीही पार पडला. आता नव्याने मंत्रिमंडळाचा खांदेपालट आणि विस्तार यांची प्रतीक्षा आहे. दरम्यान, या वरिष्ठ आणि अनुभवी नेत्यांच्या मंत्रिमंडळातील सहभागामुळे अनेक विद्यमान मंत्र्यांची कुचंबणा होणार असल्याचे सांगण्यात येते.

असाच एक पेच पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा निर्माण झाला आहे. चंद्रकांत पाटील यांच्या तुलनेत अजित पवार सर्वच बाजूंनी वरचढ असून, त्यांनी यापूर्वी अनेकदा पुण्याचे पालकमंत्रिपद भूषवले आहे. पालकमंत्री जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष असतात. त्यामुळे त्यांना जिल्ह्यावर राजकीय आणि प्रशासकीय नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे अजित पवार गटाकडून पुण्याचे पालकमंत्रिपद मागितले जाण्याची दाट शक्यता आहे. तसे झाल्यास पाटील यांची चांगलीच अडचण होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आपल्याकडील एखादे पालकमंत्रिपद सोडण्यास तयार होईल का, अशी चर्चा रंगली आहे. या गोंधळातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या वरिष्ठांना सन्मानजनक तोडगा काढावा लागणार आहे.

राजशिष्टाचाराचे काय?
पुण्याच्या पालकमंत्रिपदावरून राजशिष्टाचाराचाही मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. उपमुख्यमंत्रिपद घटनात्मक नसले, तरी त्याचा राजकीय मान आणि वजन मोठे असते. अशा वेळी चंद्रकांत पाटील पालकमंत्रिपदी राहिल्यास त्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत उपमुख्यमंत्रिपदावरील व्यक्ती केवळ एक सदस्य म्हणून कशी सहभागी होणार, असा प्रश्न अजित पवार यांच्या समर्थकांकडून विचारण्यात येत आहे.

पालकमंत्रिपदाचा निर्णय आज?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नऊ आमदारांचा शपथविधी झाला असला, तरी अद्याप खातेवाटप आणि पालकमंत्र्यांची नियुक्ती झालेली नाही. अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील हे दोघे मंत्रिमंडळात पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यामुळे विद्यमान पालकमंत्र्यांची वरिष्ठ मंत्र्यांमुळे पंचाईत होणार आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या काही तासांत अपेक्षित असून, त्यानंतर खातेवाटप आणि पालकमंत्रिपदेही जाहीर केली जाणार आहे. पुण्यातील सर्वच मंत्री ‘हेविवेट’ असल्याने आगामी काळात प्रशासनाला काम करताना कसरत करावी लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button