TOP Newsताज्या घडामोडी

अकरावीचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्याचे शिक्षकांसमोर आव्हान; प्रवेश प्रक्रिया अजूनही सुरू

नाशिक : इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया रखडतच पार पडत असतांना अद्याप रिक्त पदांची संख्या मोठय़ा प्रमाणावर आहे. याशिवाय विद्यार्थ्यांचा अभ्यास वेळेत कसा पूर्ण करायचा, असा प्रश्न शिक्षक-विद्यार्थ्यांसमोर आहे. मागील वर्षांप्रमाणे यंदाही अभ्यासक्रमाला कात्री लागते की काय, अशी शंका व्यक्त होत असतांना अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्यासाठी शिक्षकांवर जबाबदारी टाकण्यात आली आहे.

यंदा इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल उशीराने जाहीर झाला. जिल्ह्यात इयत्ता ११ वीसाठी साधारणत: २४ हजारांहून अधिक जागा असतांना त्यामधील १२ हजारांहून अधिक जागांवर प्रवेश झाला आहे. रिक्त पदांसाठी विशेष फेरींच्या माध्यमातून प्रवेश सुरू असतांना पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचे नियमीत वर्ग सुरू झाले आहेत. या प्रवेश प्रक्रियेपूर्वीच विज्ञान शाखेस प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी खासगी शिकवणी वर्गाशी संधान बांधत अभ्यासास सुरूवात केली. प्रवेश प्रक्रियेस सुरूवात होत असतांना वाणिज्य शाखेचेही खासगी शिकवणी वर्ग सुरू झाले. तुलनेत कला, किमान कौशल्य शाखेच्या विद्यार्थ्यांच्या अध्ययनास सुरूवात होऊ शकली नाही.

इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेत अद्याप विशेष फेरी सुरू आहे. २० सप्टेंबपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. विशेष फेरीतील विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात अडकलेले असतांना महाविद्यालयात विद्यार्थ्यांना जाता येत नाही. यामुळे हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मागील वर्षांप्रमाणे यंदाही इयत्ता ११ वीच्या अभ्यासक्रमाला कात्री लागण्याची शंका व्यक्त करण्यात येत होती, परंतु, वर्षभराचा अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करावा, अशा सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या असून प्राध्यापकांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांची अभ्यासक्रम आणि वेळेचे गणित जुळवितांना दमछाक होणार आहे.

‘सेतू’च्या धर्तीवर अभ्यासक्रम पूर्ण करू

मागील वर्षांप्रमाणे यंदा इयत्ता ११ वी अभ्यासक्रमाला कात्री लागणार नाही. परीक्षेचा अभ्यासक्रम आणि पुस्तकातील अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी जादा वर्ग किंवा सेतूच्या धर्तीवर विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घ्यावा, असे आवाहन प्राध्यापकांना करण्यात येईल.

– नितीन उपासनी, (अध्यक्ष, राज्य शिक्षण मंडळ)

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button