बनावट कागदपत्रे न्यायालयात सादर करून न्यायालयाची दिशाभूल आणि फसवणूक प्रकरणी तीन वकिलांसह सात जणांवर गुन्हा दाखल
जी महिला भारतात राहत नाही, तिच्या नावावरील जमिनीवर कुळ कायद्याची केस केली. न्यायालयात बनावट कागदपत्रे सदर केली. न्यायालयाची दिशाभूल आणि फसवणूक केली. तसेच संबंधित जमीन मालक महिलेची देखील फसवणूक केली. याप्रकरणी तीन वकिलांसह सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 29 जानेवारी 2020 ते जानेवारी 2022 या कालावधीत उपविभागीय अधिकारी मावळ-मुळशी यांचे कार्यालय बावधन येथे घडला.
बबन लक्ष्मण फाटक, दत्तात्रय फाटक, अमित अशोक फाटक, अभिजित अशोक फाटक (सर्व रा. भुशी, ता. मावळ), अॅड. विकास पंढरीनाथ थोरात, अॅड. एस एम घुले, अॅड. एस एस घुले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी जमीन मालक महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. त्याची चौकशी केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची मावळ तालुक्यातील भुशी गावात जमीन आहे. त्या भारतात राहत नाहीत हे माहिती असताना देखील आरोपींनी जाणीवपूर्वक शासनाची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने उपविभागीय अधिकारी मावळ-मुळशी बावधन यांच्या न्यायालयात फिर्यादी यांच्या नावावर असलेल्या जमिनीवर कुळ कायद्याची केस केली. फिर्यादी यांची बनवत सही वकीलपत्रावर करून ते खरे असल्याचे भासवून त्याचा वापर उपविभागीय अधिकारी मावळ-मुळशी यांच्या न्यायालयात केला. केसच्या सुनावणी दरम्यान ज्या ठिकाणी फिर्यादी राहत नाहीत त्या पत्त्यावर नोटीस पाठवून, फिर्यादी सुनावणीसाठी हज्र्रहात नाहीत असे आरोपींनी दाखवले. संबधित केसचा निकाल फिर्यादी यांच्या विरोधात लाऊन घेतला. त्याआधारे आरोपी कै. लक्ष्मण कोंडू फाटक यांचे वारस बबन, दत्तात्रय, अमित आणि अभिजित यांची नावे मिळकतीवर लाऊन घेतली. शासनाची व फिर्यादी यांची आरोपींनी फसवणूक केली. याबाबत फिर्यादी यांनी तक्रार अर्ज केला होता. त्याची चौकशी करून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.