breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

‘कुणी मला खुर्ची देता का खुर्ची?’ ही देवेंद्र फडणवीसांची सध्याची अवस्था-संजय राऊत

मुंबई | प्रतिनिधी 
नटसम्राट या नाटकात गणपतराव बेलवलकर यांच्या तोंडी एक वाक्य आहे, कुणी घर देता का घर? तशी सध्या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांची अवस्था आहे. कुणी खुर्ची देता का खुर्ची? ही त्यांची सध्याची अवस्था आहे असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांना संजय राऊत यांनी जोरदार टोला लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना नटसम्राट म्हणत त्यांच्यावर टीका केली होती. तसंच ते सकाळी वेगळी भूमिका घेतात आणि संध्याकाळी वेगळी भूमिका घेतात त्यांना फार महत्त्व देण्याची गरज नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं होतं. याच टीकेला संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे.

काय म्हणाले आहेत संजय राऊत?

‘देवेंद्र फडणवीस हे मला नटसम्राट म्हणाले आहेत. मात्र त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की नटसम्राट हे महाराष्ट्राचं मोठं वैभव आहे. या गोव्यालाही रंगभूमिची मोठी परंपरा आहे, मोठा वारसा आहे. महाराष्ट्रातले सगळे नटसम्राट गोव्यातूनच गेले आहेत हे त्यांना माहित नसावं. संगीत, कला, नाट्य या सगळ्याचा गोव्याला वारसा लाभला आहे. अशा गोव्याच्या जनतेचा आणि नाट्यकर्मींचा ते अपमान करत आहेत नटसम्राट या नाटकाची खिल्ली उडवून. याच नाटकात गणपतराव बेलवलकर यांच्या तोंडी एक वाक्य आहे कुणी घर देता का घर? तशी आता फडणवीसांची अवस्था आहे कुणी मला खुर्ची देता का खुर्ची? मला नटसम्राट म्हटल्याने वाईट वाटलं नाही. आम्ही रंगभूमिचे उपासक आहोत. आम्ही नटसम्राट आहोत मात्र सोंगाडे नक्कीच नाही. शब्द फिरवणारे राजकारणीही आम्ही नाही.’ असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

भाजपने गोव्यात काय यादी दिली आहे? कुणाची नावं त्यात आहेत? याच्याशी, भाजपच्या रणनीतीशी आमचा काही संबंध नाही. फक्त उत्पल पर्रिकरांबाबत आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या आहेत. असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. उत्पल पर्रिकर यांच्याविषयी संजय राऊत यांनी दाखवलेल्या सहानुभूतीला देवेंद्र फडणवीस यांनी मगरीचे अश्रू म्हटलं होतं. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की या गोष्टीला काही अर्थ नाही. आम्ही आमच्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याबाबत कुणीही बोलू शकतं. मनोहर पर्रिकर यांच्याबाबत आम्हीही कधीही वाईट चिंतलं नाही. आता त्यांचं कुटुंब खासकरून उत्पल पर्रिकर हे निवडणूक लढवू इच्छितात. त्यांना भाजपने तिकिट द्यायचं की नाही हा सर्वस्वी भाजपचा प्रश्न आहे. मात्र जर ते अपक्ष राहिले तर इतर सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्याबाबत विचार केला पाहिजे. शिवसेना नक्की त्यांचा विचार करेल. आम्ही त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही हे आम्ही ठरवलं आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button