मुंबईत रंगणार वेव्ह्ज 2025: सृजनशील अर्थव्यवस्थेचा जागतिक मेळा

मुंबई : सृजनशील क्षेत्रातून उभ्या राहणार्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र आणि मुंबईचं स्थान अतिशय महत्त्वाचं असून बदलत्या तंत्रज्ञानाच्या या काळात हे स्थान अबाधित राखण्याच्या उद्देशानं वेव्ह्ज 2025चं आयोजन मुंबईत होणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईत केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह वेव्ह्जच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते.
वेव्ह्ज ही या क्षेत्रातली जगातली सर्वात मोठी परिषद असून जगभरातल्या 100 पेक्षा जास्त देशांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी करण्याची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची इच्छा असून तो मुंबईतच होईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. यासोबतच अश्विनी वैष्णव आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या विविध रेल्वे प्रकल्पांच्या कामाचाही आढावा घेतला.
हेही वाचा – वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने विदर्भात हाहाकार: पिके उद्ध्वस्त, सौर पॅनल्सचेही नुकसान
दरम्यान वेव्हज 2025 अंतर्गत खादीच्या वापराला उत्तेजन देण्याकरता नवकल्पना विकसित करण्यासाठी आयोजित केलेल्या मेक द वर्ल्ड वेअर खादी या स्पर्धेच्या अंतिम विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. त्याचबरोबर इनोव्हेट टू एज्यूकेट : हॅण्डहेल्ड डिवाईस डिझाईन चॅलेंज या स्पर्धेच्या दहा विजेत्यांची घोषणाही इंडियन डिजिटल गेमिंग सोसायटीने केली आहे. हे विजेते येत्या एक ते चार मे दरम्यान मुंबईत होणार्या वेव्हजच्या अंतिम फेरीत सहभागी होणार आहेत.