वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने विदर्भात हाहाकार: पिके उद्ध्वस्त, सौर पॅनल्सचेही नुकसान

नागपूर : ऐन उन्हाळ्यात पूर्व विदर्भात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. भंडारा जिल्ह्यासह अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान केले. टोमॅटो आणि आंब्याच्या बागायती शेतीवर संकट कोसळले असून, सौर ऊर्जा पॅनल्स आणि लग्न मंडपांचेही मोठे नुकसान झाले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले. 10 एप्रिलच्या सायंकाळी अर्ध्या तासाच्या वादळी पावसाने टोमॅटोच्या पिकांचे मोठे नुकसान केले. लग्नसराईमुळे टोमॅटोला चांगले दर मिळू लागले असतानाच पावसाने पिके खराब झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले. याशिवाय, वादळी वाऱ्यामुळे आंब्याचेही मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी लग्नासाठी उभारलेले मंडप फाटले, उडून गेले, ज्यामुळे आयोजकांचीही दमछाक झाली.
हेही वाचा – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात वाहतूक बदल
भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यात वादळी वाऱ्याने शेतात आणि घरांवर उभारलेले सौर ऊर्जा पॅनल्स तुटून दूरवर फेकले गेले. यामुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. वादळामुळे अनेक ठिकाणी वृक्ष कोसळल्याने विद्युत तारा तुटल्या, ज्यामुळे वीज पुरवठाही खंडित झाला.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. पिकांचे नुकसान आणि सौर पॅनल्सच्या तोट्याने शेतकऱ्यांपुढे मोठे संकट उभे ठाकले आहे. प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळण्याची मागणी होत आहे.