गौतम अदानी आता मुकेश अंबानींच्या फक्त एक पाऊल मागे, 4 दिवसांपासून संपत्तीत मोठी वाढ
Bloomberg Billionaires Index : शेअर बाजारातील तेजीच्या काळात भारतीय उद्योगपतींची संपत्तीही वाढत आहे. गेल्या काही दिवसांत अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली होती. ज्याचा थेट फायदा गौतम अदानी यांच्या नेटवर्थला झाला आहे.
ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या ताज्या निर्देशांकानुसार, गेल्या एका आठवड्यात गौतम अदानी यांच्या संपत्तीत झपाट्याने वाढ झाली आहे. प्रथम, त्यांनी 100 अब्ज डाॅलर्सच्या क्लबमध्ये पुन्हा प्रवेश केला आणि सध्या त्यांची एकूण संपत्ती 109 अब्ज डाॅलर आहे. म्हणजे जवळपास एका आठवड्यात अदानीची संपत्ती 9 अब्ज डाॅलरने वाढली आहे.
हेही वाचा – नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाह, फडणवीसांनी रसद पुरवली; संजय राऊतांचे सनसनाटी आरोप
ब्लूमबर्गच्या अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी सध्या 13व्या क्रमांकावर आहे. मुकेश अंबानी त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे आहेत. सध्या मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती सुमारे 114 अब्ज डाॅलर आहे. अब्जाधीशांच्या यादीत गौतम अदानी मुकेश अंबानी यांच्यापेक्षा 5 अब्ज डॉलर्स संपत्तीत मागे आहेत.
जर आपण रँकबद्दल बोललो तर, ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्समध्ये मुकेश अंबानी 12 व्या स्थानावर आहेत, तर गौतम अदानी 13 व्या स्थानावर आहेत. या आठवड्यात अदानी ग्रुपच्या सर्व 10 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली होती. मात्र, शुक्रवारी व्यापार सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सवर काहीसा दबाव आहे. विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर शेअर बाजारातही प्रॉफिट बुकींगचा बोलबाला आहे.
ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकात बर्नार्ड अर्नॉल्ट अव्वल स्थानावर आहेत, त्यांची एकूण संपत्ती 211 अब्ज डाॅलर आहे, जेफ बेझोस दुसऱ्या, टेस्ला प्रमुख एलोन मस्क तिसऱ्या, मार्क झुकरबर्ग चौथ्या, तर लॅरी पेज 5 व्या स्थानावर आहेत. त्यांच्या मागे सहाव्या क्रमांकावर बिल गेट्स आहेत.