घाटकोपर होर्डिंग दुर्घटना : भावेश भिंडेला 29 मेपर्यंत पोलीस कोठडी
युनिट सातचे अधिकारी गुन्ह्यांचा तपास करत आहेत
मुंबई : घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी इगो मीडिया प्रा. लिमिटेड कंपनीचा मालक भावेश भिंडे याला अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी के.एस.झंवर यांनी 29 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
या गुन्ह्यांचा तपास आता पंतनगर पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून युनिट सातचे अधिकारी या गुन्ह्यांचा तपास करत आहेत.सोमवारी मुंबईत झालेल्या पावसामुळे घाटकोपर येथील होर्डिंग पेट्रोल पंपावर पडून 16 जणांचा मृत्यू झाला होता. होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी पंतनगर पोलिसांनी भावेश भिंडे आणि इतर जणांविरोधात गुन्हा नोंद केला होता. या गुन्ह्याच्या तपासासाठी सात पथके तयार केली होती.
पोलीस मागावर असल्याचे समजताच भिंडे हा लोणावळा येथे पळून गेला होता. त्यानंतर तो अहमदाबाद येथून उद्यपूर येथे गेला. तेथे तो एका हॉटेलमध्ये लपून बसला होता. त्याची माहिती समजताच पोलीसांनी उद्यपूर येथून भिंडेला अटक केली.





