फारूक अब्दुल्ला यांनी केली ४३ कोटींची अफरातफर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/07/farooqabdullah.jpg)
नवी दिल्ली -सीबीआयने आज जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले. जम्मू-काश्मीर क्रिकेट संघटनेच्या (जेकेसीए) निधीची अफरातफर केल्याच्या आरोपावरून हे पाऊल उचलण्यात आले.
नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख असणाऱ्या अब्दुल्ला यांनी अनेक वर्षे जेकेसीएचे अध्यक्षपद सांभाळले. त्या पदाची धुरा अब्दुल्ला यांच्याकडे असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) क्रिकेटशी संबंधित विविध सुविधांच्या विकासासाठी जेकेसीएला 2002 ते 2011 या कालावधीत 112 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध केला. त्यातील 43 कोटी रूपयांची अफरातफर झाल्याचा आरोप आहे. त्यावरून सीबीआयने अब्दुल्लांसह चौघांविरोधात श्रीनगरमधील विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यात मोहम्मद सलीम खान आणि अहसान अहमद मिर्झा या जेकेसीएच्या तत्कालीन पदाधिकाऱ्यांनाही आरोपी करण्यात आले आहे.