पाकिस्तानने भारताला शिकवू नये, ओवेसी यांनी इम्रान खान यांना सुनावले

एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतासंबंधी केलेल्या वक्तव्यावर टीका करताना तिखट प्रतिक्रिया दिली आहे. सर्व समावेशक राजकारण आणि अल्पसंख्यांकांच्या अधिकाराबद्दल पाकिस्तानला भारताकडून शिकलं पाहिजे असं सांगत असदुद्दीन ओवेसी यांनी पाकिस्तानला आरसा दाखवला आहे. इम्रान खान यांनी अभिनेता नसरुद्दीन शाह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत भारतात अल्पसंख्यांकाना समान वागणूक दिली जात नसल्याचं म्हटलं होतं.
इम्रान खान यांच्या वक्तव्यावर टीका करताना ओवेसी यांनी ट्विट केलं आहे की, ‘पाकिस्तानी राज्यघटनेनुसार फक्त मुस्लिम व्यक्ती राष्ट्रपती होऊ शकतो. भारताने मात्र अनेक वंचित समुदायाचे राष्ट्रपती पाहिले आहेत. इम्रान खान यांच्यासाठी ही योग्य वेळ आहे जेव्हा त्यांनी सर्व समावेशक राजकारण आणि अल्पसंख्यांकांच्या अधिकाराबद्दल भारताकडून शिकावं’.
काय बोलले होते इम्रान खान –
पाकिस्तानधील पंजाब प्रांतातील सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त लाहोरमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी नसरुद्दीन शाह यांच्या वक्तव्याचा आधार घेत भारतावर टीका केली. इम्रान खान बोलले की, ‘आता तर भारतातील लोकही अल्पसंख्यांकाना समान वागणूक मिळत नसल्याचं बोलू लागले आहेत’. पुढे बोलताना त्यांनी अल्पसंख्यांकांसोबत कसं वागलं पाहिजे हे आपण नरेंद्र मोदींना दाखवू असंही म्हटलं होतं.
काय बोलले होते नसरुद्दीन शाह –
गाईचा जीव माणसाच्या जीवापेक्षा महत्त्वाचा झाला आहे. समाजात विष पसरले जात आहे. या परिस्थितीची मला खूप भीती वाटते. अचानक जमावानं माझ्या मुलांना घेरलं आणि तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम असा प्रश्न त्यांना विचारला तर काय होईल ? मला माझ्या मुलांची चिंता वाटते अस नसरुद्दीन शाह यांनी म्हटलं होतं.





