पाकची फजिती करणाऱ्या मलिहा लोधींची संयुक्त राष्ट्रातून हकालपट्टी

संयुक्त राष्ट्रांमधील पाकिस्तानच्या राजदूत मलिहा लोधी यांची पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी आता मुनीर अक्रम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुनीर अक्रम यांनी यापूर्वी 2002 ते 2008 दरम्यान या पदावर आपली जबाबदारी पार पाडली आहे. न्यूयॉर्क येथील मुख्यालयात ते कार्यरत असतील.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक नियुक्त्या केल्या आहेत. राजदूत मुनीर अक्रम यांच्या व्यतिरिक्त पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने अन्य नियुक्त्यांचीदेखील घोषणा केली. संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे महासंचालक खलील अहमद हाशमी यांची संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानच्या स्थायी प्रतिनिधीच्या रूपात नियुक्ती करण्यात आली आहे. तसंच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीन नव्या राजदुतांचीही नियुक्ती केली आहे. मोहम्मद एजाझ यांना हंगेरीचे तर सय्यद सज्जाद हैदर यांना कुवैतचे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
लोधींमुळे पाकची फजिती
मलिहा लोधी यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकदा पाकिस्तानची फजिती झाली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा त्यांनी परराष्ट्र मंत्री असा उल्लेख केला होता. पंतप्रधान इम्रान खान यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानांची भेट घेतल्यानंतर त्यांनी याबाबत ट्विट केलं होतं. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांनी ट्रोल करण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर त्यांनी ट्विट केलेला फोटो डिलिट करत नवं ट्विट केलं आणि जुन्या ट्विटबद्दल माफीही मागितली होती.





