पश्चिम बंगाल कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह शिगेला

- प्रदेशाध्यक्षांना हटवण्याची जोरदार मागणी
कोलकता – पश्चिम बंगाल कॉंग्रेसमधील अंतर्गत कलह शिगेला पोहचला आहे. त्यातून जिल्हास्तरावर कार्यरत असणाऱ्या कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष अधीर चौधरी यांना हटवण्याची जोरदार मागणी केली आहे.
पश्चिम बंगाल कॉंग्रेसचे नवे प्रभारी गौरव गोगोई पहिल्या दौऱ्यासाठी येथे दाखल झाले. मात्र, पहिल्याच दौऱ्यात त्यांना विकोपाला गेलेली पक्षांतर्गत धुसफूस पाहावी लागली. पक्षाच्या काही जिल्हा समित्यांनी त्यांच्याकडे चौधरी यांना हटवण्याची मागणी करणारी पत्रं सादर केली. चौधरी यांची वर्तणूूक अरेरावीची आहे. त्यामुळे अनेक नेते आणि कार्यकर्ते कॉंग्रेसमधून बाहेर पडत आहेत.
पक्षाच्या पुनरूज्जीवनासाठी चौधरी यांना प्रदेशाध्यक्षपदावरून हटवण्यात यावे, असे त्या पत्रांमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, गोगोई यांनी पक्षांतर्गत कलहाला फारसे महत्व देण्याचे टाळले. तुम्ही ज्याला पक्षांतर्गत नाराजी समजता; तिचे स्वरूप आमच्या दृष्टीने पक्षांतर्गत लोकशाहीसारखे आहे. आमच्या पक्षात मत आणि भूमिका मांडण्याची मोकळीक आहे. कॉंग्रेस म्हणजे भाजप नाही. त्या पक्षात प्रत्येक जण जाहीरपणे मत व्यक्त करण्यास घाबरतो, असे ते पत्रकारांशी बोलताना म्हणाले.





