पंतप्रधान मोदींची पुतीन यांच्याशी चर्चा

जोहान्सबर्ग – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेते सध्या ब्रिक्स देशांच्या बैठकीच्या निमीत्ताने येथे एकत्र आले आहेत. यानिमीत्त मोदींनी पुतीन यांची स्वतंत्र भेट घेऊन भारत-रशिया द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. या दोन्ही नेत्यांमध्ये रशियात गेल्या मे महिन्यात चर्चा झाली होती. त्यानंतर हे नेते पुन्हा एकमेकांना भेटले आहेत.
या भेटीच्या संबंधात ट्विटरवर माहिती देताना मोदी यांनी म्हटले आहे की पुतीन यांच्या बरोबर आज अनेक विषयांवर चर्चा झाली. भारताचे रशियाबरोबर अत्यंत घनिष्ट संबंध आहेत. आम्ही अनेक क्षेत्रात यापुढेही एकमेकांबरोबर काम करणार आहोत असे त्यांनी म्हटले आहे. ब्रिक्स परिषदेसाठी मोदींचे जोहांन्सबर्ग येथे बुधवारी आगमन झाले आहे. ब्रिक्स ही संघटना पाच देशांची असून जगातील एकूण लोकसंख्येपैकी 40 टक्के लोकसंख्या या देशांमध्ये राहते.





