न्यू पुणे पब्लिक स्कूलचा मनमानी कारभार
बेकायदेशीर फीवाढीविरोधात संतप्त पालकांचा उद्रेक

पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
निगडी प्राधिकरण परिसरातील न्यू पुणे पब्लिक स्कूल प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता तब्बल १५ टक्के फी वाढ केल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, या बेकायदेशीर व नियमबाह्य निर्णयाविरोधात शेकडो संतप्त पालकांनी शाळेवर मोर्चा काढत शाळा प्रशासन तसेच संचालक प्रदीप खंदारे यांच्याविरोधात तीव्र आंदोलन केले.
पालकांच्या म्हणण्यानुसार, विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात गरज नसलेल्या विविध कोर्सेस सक्तीने दाखवून, त्याच्या नावाखाली फीमध्ये १५ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. ही फीवाढ करताना ना पालकांची संमती घेण्यात आली, ना कोणतीही लेखी पूर्वसूचना देण्यात आली. त्यामुळे शाळा प्रशासनाच्या या मनमानी कारभारामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ही जाचक आणि बेकायदेशीर फीवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी, अशी ठाम मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.
फीवाढीपुरतेच नव्हे तर शैक्षणिक साहित्य, वह्या, पुस्तके, गणवेश तसेच इतर आवश्यक वस्तूही शाळा प्रशासनाकडूनच खरेदी करण्याची सक्ती पालकांवर केली जात असल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, या सर्व वस्तू बाजारभावापेक्षा अधिक किमतीत विकल्या जात असल्याने पालकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. यामुळे सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय पालकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.
हेही वाचा – एस. बी. पाटील पब्लिक स्कूल सीबीएसई दहावीचा शंभर टक्के निकाल
महापालिका सभागृहात होणार संयुक्त बैठक
या सर्व प्रकाराविरोधात संतप्त पालकांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. तक्रारीची गंभीर दखल घेत, शिक्षण विभागाने एका आठवड्यात शाळा प्रशासन, पालक प्रतिनिधी आणि शिक्षण अधिकारी यांची संयुक्त बैठक महानगरपालिका सभागृहात बोलावण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. या बैठकीत न्यू पुणे पब्लिक स्कूलमधील नियमबाह्य फीवाढ, शाळेतील असुविधा, महागडी व सक्तीची शैक्षणिक साहित्य खरेदी तसेच प्रशासनाच्या मनमानी कारभारावर सविस्तर चर्चा करून योग्य तो मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहे.
“..अन्यथा आंदोलन अधिक तीव्र होणार”
दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही पालकांनी दिला असून, महानगरपालिका प्रशासनाने यामध्ये गांभीर्याने लक्ष द्यावे व शाळा प्रशासनाला कडक नियम लावून त्याची अंमलबजावणी करावी. हा प्रश्न केवळ न्यू पुणे पब्लिक स्कुलपुरता मर्यादित न राहता संपूर्ण शहरातील खासगी शाळांच्या मनमानी कारभाराविरोधातील लढा ठरेल, अशी भूमिका पालकांनी यावेळी मांडली.





