शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोला मिळाली गती!

पुणे : शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गावरील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील डबल डेकर पूल आणि पिंपरी-चिंचवड हद्दीतील १७ किलोमीटरच्या वायडक्ट ही महत्त्वाची आणि जोखमीची कामे पूर्ण झाली आहेत. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गावरील वरील दोन कामे महत्त्वाची आणि धोक्याची असल्याने मेट्रोने या मार्गावरील महत्त्वपूर्ण कामामध्ये यश मिळाल्याचे मानले जाते. यामुळे खऱ्या अर्थाने शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो कामाला गती मिळाली आहे. दरम्यान, उरलेले ३२ टक्के काम नियोजित वेळेत म्हणजेच पुढील आठ ते नऊ महिन्यात पूर्ण करण्याचा मेट्रोचा मानस आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहराला लागूनच असलेली दुसरी मेट्रो लवकरच कार्यान्वित होणार आहे.
मेट्रोचे एकूण ६८ टक्के काम पूर्ण झाले असून ३२ टक्के काम सध्या शिल्लक आहे. ८ महिन्यात उर्वरित कामे केली जातील, अशी माहिती ‘पीएमआरडीए’ने दिली. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोचे काम सार्वजनिक- खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर टाटा समूहाने काम हाती घेतले आहे. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) यांच्याकडे या प्रकल्पाचे नियंत्रण आहे.
हेही वाचा – शेतकऱ्यांना ५ वर्ष मोफत वीज, शासनाने काढला जीआर; जाणून घ्या माहिती
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोर डबल डेकर बसविण्याचे काम सुरू होते. हे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे. १७ किलोमीटर वायडक्ट बसविण्याचे काम सुरू होते. ते काम देखील पूर्ण करण्यात आले आहे. वाकड आणि हिंजवडी (फेज १) या भागात गर्डर आणि खांबावर पिअर कॅम्प बसविण्यात आले आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गाचे खांब बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे. या कामाबरोबरच स्थानक उभारणीचे काम सुरू आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो मार्गापैकी वाकड चौक ते मेगापोलीस सर्कल हे अंतर साडे आठ किलोमीटरचे असून एकूण नऊ स्थानके असणार आहेत. हे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती ‘पीएमआरडीए’च्या वतीने देण्यात आली.
शिवाजीनगर ते हिंजवडी-माण या तिसऱ्या मेट्रो मार्गाचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. २३ किलोमीटरचा हा मार्ग असून या प्रकल्पासाठी ८ हजार ३१३ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. कामाला अद्याप नऊ महिन्यांची मुदत शिल्लक आहे. त्या मुदतीच्या आत ही कामे पूर्ण करून घेण्यात येतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तसेच रूळ बसविल्यानंतर मेट्रोची चाचणी घेण्यात येणार आहे.





