नितीश यांनी भाजपला दिला अप्रत्यक्ष संदेश

नवी दिल्ली – भ्रष्टाचार, गुन्हे आणि जातीयवादाला प्रखर विरोध असल्याची भूमिका बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीशकुमार यांनी मांडली. बिहारमधील जातीय तणावाला आणि हिंसाचाराला भाजपचे काही नेते जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे नितीश यांनी त्यांच्या वक्तव्यातून मित्रपक्ष भाजपला अप्रत्यक्ष संदेश दिल्याचे मानले जात आहे.
जेडीयूच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक येथे झाली. त्या बैठकीत नितीश बोलत होते. बिहारमध्ये जेडीयूची ताकद कमी होण्याची इच्छा काही जण बाळगून आहेत. मात्र, तसा विचार करणाऱ्यांचीच ताकद कमी होईल, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. जेडीयू आणि भाजपचे संबंध ताणले गेल्याचे चित्र आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागावाटपावरून आतापासूनच त्या मित्रपक्षांमध्ये तणातणी सुरू असल्याचे दिसते.
मात्र, आम्ही भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा घटक आहोत. त्यामुळे मित्रपक्षांसमवेतच लोकसभा निवडणूक लढवू, असे बैठकीत जेडीयूने स्पष्ट केले. या बैठकीत स्वत: नितीश यांनी जागावाटपाबाबत आताच थेट काही बोलणे टाळले. जागावाटपाबाबत भाजपकडून प्रस्ताव आल्यानंतरच तो आपल्या हिताचा आहे की नाही हे जेडीयू ठरवू शकेल, असे त्यांनी म्हटले.





