वांगचुक रुग्णालयात तरीही आंदोलन सुरूच! अभिजित दिपके यांचे जंतर-मंतरवर बेमुदत उपोषण

नवी दिल्ली | जंतर-मंतर येथे गेल्या २१ दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसलेले कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी शनिवार सकाळी रुग्णालयात दाखल केलं. दिल्ली पोलिसांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, वांगचुक यांना आवश्यक वैद्यकीय उपचारांसाठी रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. त्यामुळे या आंदोलनाला पूर्णविराम मिळणार अशी शंका निर्माण झालेली असतानाच अभिजीत दिपके यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
सोनम वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर अभिजित दिपके यांनी शनिवारी तातडीने अनिश्चित कालीन उपोषणाची घोषणा केली. “मी आजपासून अनिश्चित काळासाठी उपोषण सुरू करत आहे. मी सर्वांना आवाहन करतो की मागे हटू नका; हे आंदोलन आता आणखी मोठे होईल. पोलिसांनी वांगचुक यांना रुग्णालयात दाखल करून मोठी चूक केली आहे. मी सर्वांना जंतर-मंतर येथे येण्याचे आवाहन करतो. आपले आंदोलन येथूनच पुढे सुरू राहील आणि २० जुलै रोजी नियोजित असलेला संसदेवरील मोर्चा आपण कोणत्याही परिस्थितीत पुढे नेणारच,” असा निर्धार अभिजित दिपके यांनी व्यक्त केला.
हेही वाचा
पुनावळेतील सर्व्हिस रोडचे तातडीने सिमेंट काँक्रीटीकरण करा; NHAI कडे भाजपाचे नवनाथ ढवळे यांची मागणी
पोलिसांनी रस्त्यावरच मारहाण केल्याचा आरोप
आंदोलनासाठी जंतर-मंतर येथे जात असताना दिल्ली पोलिसांनी आपल्याला अडवून मारहाण केल्याचा गंभीर आरोपही अभिजित दिपके यांनी केला आहे. “तू जंतर-मंतरपर्यंत कसा पोहोचतोस तेच आम्ही पाहतो,” अशी धमकी पोलिसांनी दिल्याचा दावा त्यांनी केला.
जंतर-मंतरवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त
२० जुलै रोजी आंदोलक संसदेवर धडक मोर्चा काढणार आहेत. या नियोजित मोर्चाच्या अवघ्या दोन दिवस आधी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. सध्या जंतर-मंतर येथे दिल्ली पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, पोलिसांनी आंदोलकांना लवकरात लवकर ही जागा रिकामी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे आंदोलक आणि पोलीस प्रशासनामध्ये सध्या प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.





