Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

भाजपला लवकरच मिळणार नवा प्रदेशाध्यक्ष?

आशिष शेलार आणि राम शिंदेंचे नाव आघाडीवर

मुंबई : राज्यातील सत्तेतून मागील अडीच वर्षांपासून दूर असलेल्या भाजपने शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या मदतीने पुन्हा एकदा सत्तेत पुनरागमन केलं आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सरकार स्थापन झालं असलं तरी मंत्रिमंडळात कोणा-कोणाची वर्णी लागणार, याबाबत अद्यापही खलबतं सुरू आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता असल्याने पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा कोणाच्या खांद्यावर द्यावी, याबाबत आता भाजपमध्ये विचारमंथन सुरू झालं असून काही नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत.

राज्यात भाजपची सत्ता आली असली तरी चंद्रकांत पाटील यांच्यावर पक्ष संघटनेची जबाबदारी कायम ठेवण्यात येईल, असं सुरुवातीच्या काळात बोललं जात होतं. कारण प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळल्यापासून पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पारंपरिक गड मानल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी आक्रमकपणे काम करत भाजप कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवून राज्यात पक्षाची एकहाती सत्ता आणण्यासाठी पाटील यांनाच भाजप नेतृत्वाकडून प्रदेशाध्यक्ष म्हणून कायम ठेवलं जाईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र समर्थकांसह स्वत: चंद्रकांत पाटील यांच्याकडून मंत्रिपदाची मागणी करण्यात येत असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार असून नव्या प्रदेशाध्यक्षाचा शोध सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

एकनाथ शिंदे गटाच्या साथीने भाजपने राज्याची सत्ता काबीज करण्यात यश मिळवलं असलं तरी २०२४ ला होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळवण्यासाठी पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी पूर्णवेळ संघटनेसाठी काम करणाऱ्या व्यक्तीकडे भाजपकडून प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात येऊ शकते. त्यामुळे पक्षाकडून राम शिंदे आणि आशिष शेलार यांच्या नावावर विचार केला जात आहे. आमदार आशिष शेलार यांनी याआधी भाजपचे मुंबई अध्यक्ष म्हणून काम केलं आहे. शेलार यांच्या कार्यकाळात भाजपने मुंबईत विविध निवडणुकांमध्ये चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे शेलार यांच्या संघटन कौशल्याचा राज्यपातळीवरही पक्षाला फायदा व्हावा, यासाठी त्यांना प्रदेशाध्यपद देण्यात येऊ शकते.

दुसरीकडे, राम शिंदे हेदेखील भाजप प्रदेशाध्यक्षपदाच्या स्पर्धेत आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत-जामखेड मतदारसंघातून २००९ आणि २०१४ मध्ये विजय मिळवणाऱ्या राम शिंदे यांचा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या रोहित पवार यांच्याकडून पराभव झाला होता. मात्र या पराभवानंतरही खचून न जाता त्यांनी जनतेशी असलेली नाळ तोडली नाही. पक्षाने दिलेली गोवा विधानसभा निवडणुकीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. राम शिंदे पक्षाशी असलेली एकनिष्ठा आणि योगदान पाहून भाजपा प्रदेश कोअर कमिटी सदस्य म्हणूनही जबाबदारी देण्यात आली आहे. तसंच काही दिवसांपूर्वी पक्षाने त्यांना विधानपरिषदेतही पाठवलं आहे. तसंच शिंदे हे धनगर समाजाचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद देऊन सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाऊ शकतो.

दरम्यान, भाजपकडून अद्याप अधिकृतरित्या प्रदेशाध्यपदाबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे आगामी काळात चंद्रकांत पाटील हे प्रदेशाध्यपद सोडतात का आणि त्यांनी पद सोडल्यास ही जबाबदारी कोणाकडे देण्यात येते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button