breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

सत्ता गेल्याने आंदोलनांच्या माध्यमातून भाजपची तडफड- अशोक चव्हाण

  • सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची टीका

परभणी |

इतर मागास वर्गीय समाजघटकांची वस्तुनिष्ठ माहिती असलेला संबंधित समाजाचा विदा (डाटा) नीती आयोगाकडे उपलब्ध असताना तो देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळातही राज्याला उपलब्ध करून दिला गेला नाही आणि आम्हालाही तो दिला जात नसल्याची वस्तुस्थिती असताना भाजपवाले ‘ओबीसी’ आरक्षणावरून राज्य शासनावर आगपाखड करत आहेत. सत्ता हातची गेल्याने गेल्या वीस महिन्यांपासून भाजपची तडफड सुरू आहे. राज्यात अनेक पद्धतीने आंदोलने छेडण्याचा प्रकार हा त्याचाच भाग आहे, अशी टीका सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी येथे केली. जिल्ह्यात आयोजित विविध ठिकाणच्या विकासकामांच्या कार्यक्रमांस उपस्थित राहण्यासाठी येथे आलेले मंत्री चव्हाण पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.

ते म्हणाले, पीकविम्याबाबत भाजपचे लोक आगपाखड करत आहेत. निकषानुसार पीकविम्याचा परतावा शेतकऱ्यांना मिळायलाच हवा पण पंतप्रधानांच्या नावे असलेली ही योजना राबविण्याची जबाबदारी केंद्राची आहे. निकष आणि एजन्सी केंद्राने निश्चित केल्या आहेत. पाच ते सहा राज्यांनी पंतप्रधान पीकविमा योजनेतून आपले अंग काढून घेतले आहे. खुद्द गुजरात या पंतप्रधानांच्या राज्यानेही या पीकविमा योजनेतून अंग काढून घेतले आहे. असे असताना पीकविमा प्रश्नी राज्य सरकारवर टीका करण्याचे कारण नाही, असेही चव्हाण म्हणाले. परभणी येथे पेट्रोल डिझेलचे दर देशात सर्वाधिक असताना भाजपचे लोक त्याबद्दल मात्र बोलत नाहीत असा टोलाही त्यांनी लगावला.

१०२ वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर आरक्षणाचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्याला नाहीत. तरीही त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाची दिशाभूल करत राज्याला अधिकार नसताना हा निर्णय घेतला. मराठा, मुस्लिम, ओबीसी, धनगर अशा सर्वच समाजघटकांच्या आरक्षणाबद्दल तीनही पक्षांची महाविकास आघाडी मात्र कटिबद्ध आहे असे यावेळी चव्हाण यांनी सांगितले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान, आमदार राहुल पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश वरपुडकर, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button