breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडामहाराष्ट्र

घरपोच मोफत सातबारा देणार- बाळासाहेब थोरात

नगर |

पुढील महिन्यात महसूल विभागाच्या मार्फत सर्व शेतकऱ्यांना घरपोहोच मोफत सातबारा देणार असून सर्वानी तो बारकाईने बघून त्यात काही चुका असल्यास तत्काळ दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. ‘ई पीक’ पाहणी प्रारंभ तसेच श्रीरामपूर उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा नियोजन समिती व आमदार निधीतून उभारलेल्या हवेतून प्राणवायू निर्मिती प्रकल्प तसेच शंभर ऑक्सिजन बेड विस्तारित कोविड वॉर्ड व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ ऑनलाइन होते तर व्यासपीठावर आमदार लहू कानडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. संदीप सांगळे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, माजी नगराध्यक्षा राजश्री ससाणे, उपनगराध्यक्ष करण ससाणे आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, की शेतकरी हिताचे अनेक निर्णय महाविकास आघाडी सरकार घेत आहे. शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरील अनेक अनावश्यक नोंदी काढल्या जाणार आहेत. सातबाऱ्यासोबत ‘आठ अ’ देखील ऑनलाइन मिळणार आहे. सातबाऱ्यावर जे काही व्यवहार होतात त्यावेळी त्याला फेरफार पडतो त्यावर क्लिक केले की नंतरचे सर्व फेरफारही ऑनलाइन मिळणार आहे. खरेदी खताची नोंदही महिनाभरात कशी होईल याचाही निर्णय घेण्यात आला आहे. ‘ई-पीक’ पाहणी उपक्रमाचा सर्वानी लाभ घ्यावा. त्यामध्ये कोणत्या भागात कोणते पीक कमी जास्त आहे याचा गोषवारा उपलब्ध होणार आहे. थोरात म्हणाले, की आमदार कानडे यांच्या दूरदृष्टीतून श्रीरामपूर तालुक्यात विकासकामे झाली आहेत. त्यांनी उभारलेले कोविड केंद्र हे जिल्ह्यतील आदर्श ठरणार आहे.

कानडे म्हणाले, की श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालयाला रुग्णवाहिका नव्हती, करोना काळात अवाच्या सव्वा भाडे आकारले जायचे, गरिबांना स्वस्तात उपचार मिळत नव्हते, ऑक्सिजन नव्हता म्हणून आपण पुढाकार घेऊन प्राणवायू निर्मिती प्रकल्प, विस्तारित करोना ऑक्सिजन बेड असलेला वॉर्ड उभा केला. नगरपालिका क्षेत्रात विविध विकासकामे करण्यासाठी पाच कोटींचा निधी दिला आहे. मुश्रीफ म्हणाले, की श्रीरामपूर येथे उभारलेला ऑक्सिजन प्रकल्प व कोविड केंद्र हे राज्यातील एक आदर्श केंद्र ठरेल. जिल्हाधिकारी भोसले यांनी दुसऱ्या लाटेत जिल्ह्यत ३ लाख २५ हजार रुग्ण सापडले मात्र त्यापैकी ३ लाख १० हजार रुग्ण बरे झाले तर ६ हजार ५०० रुग्ण दगावले आहेत. जिल्ह्यला ऑक्सिजन मिळाला नसता तर अनेक लोक दगावले असते असे सांगितले. ‘ई पीक’ पाहणी प्रारंभ तसेच श्रीरामपूर उपजिल्हा रुग्णालयात उभारलेल्या प्राणवायू निर्मिती प्रकल्प लोकार्पण सोहळ्यात बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात. समवेत आमदार लहू कानडे, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button