पिंपरी-चिंचवडमधील खेळाडूंना मिळणार 3 हजारांपासून साडे पाच हजार रुपयांची क्रीडा शिष्यवृत्ती
वार्षिक होणार मदत : महापालिकेच्या क्रीडा विभागाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन

पिंपरी: राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा, आंतरविद्यापीठ तसेच राष्ट्रीय स्तरावरील क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना आता क्रीडा शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. राज्य शासनाच्या क्रीडा विभागाच्या सूचनेनुसार पिंपरी-चिंचवड महापालिका त्याची अंमलबजावणी करणार आहे. त्यासाठी महापालिकेच्या क्रीडा विभागाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. त्यानुसार शहरातील गुणवंत खेळाडूंना साडे तीन हजार ते साडे पाच हजार रुपयांपर्यंत वार्षिक क्रीडा शिष्यवृत्तीचा हातभार लावला जाणार आहे.
2022-23 या वर्षाची क्रीडा शिष्यवृत्ती 2023-24 मध्ये पात्र विद्यार्थी खेळाडूंना देण्यात येणार आहे. त्यासाठी खेळाडूंनी 28 नोव्हेंबर ते 29 डिसेंबर या काळात विहित नमुन्यात अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज क्रीडा विभाग अथवा महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर डाऊनलोड करून घेऊन आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करायचा आहे. 10 डिसेंबर ते 29 डिसेंबर 2023 या कालावधीत महापालिकेच्या वेळेत क्रीडा विभागात सादर करायचा आहे. मुदत संपल्यानंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नसल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.
शिष्यवृत्तीचा मिळणारा लाभ…
पिंपरी चिंचवड महापालिका परिसरातील गुणवान विद्यार्थी खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने क्रीडा शिष्यवृत्तीची योजना सुरू केली आहे. ही शिष्यवृत्ती महाराष्ट्र शासन क्रीडा व युवक संचालनालय यांच्या तर्फे दिली जाणार आहे. राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा, आंतरविद्यापीठ स्तर, राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धा आदी स्पर्धा खेळणाऱ्यांचा यामध्ये समावेश केला आहे. राज्यस्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थी खेळाडूंना वर्षाकाठी 3 हजार 300 रुपये दिले जाणार आहेत. यासह असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटी तर्फे आयोजित आंतरविद्यापीठ (राष्ट्रीय) स्तरावर सहभागी झालेल्या विद्यार्थी खेळाडूंना वार्षिक 3 हजार 300 रुपये मिळणार आहेत. तर राष्ट्रीय शालेय स्पर्धात (नॅशनल स्कूल गेम / स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडिया) तर्फे आयोजित राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थी खेळाडूंना 5 हजार 500 रुपये क्रीडा शिष्यवृत्ती भेटणार आहे.