अरुण पाडुळे स्पोर्ट्स फाऊंडेशनची “गगनभरारी”
साइराज पारखी, वेदांत बाबर यांची राष्ट्रीय खेळाडू म्हणून निवड: अनुष्का बाबरला युनिव्हर्सिटी स्पर्धेत सुवर्णपदक

पिंपरीः अरुण पाडुळे स्पोर्ट्स फाऊंडेशनच्या साइराज नवनाथ पारखी व वेदांत वसंत बाबर यांची राष्ट्रीय खेळाडू म्हणून निवड झाली आहे. तर अनुष्का बाबर हिने युनिव्हर्सिटी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.
नॅशनल रायफल असोसिएशन दिल्ली आयोजित पूर्व राष्ट्रीय स्पर्धा ही कलकत्ता येथील असनसोल येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भारतातील सर्व राज्यातून विविध गटातील हजारो पिस्तुल व रायफल नेमबाजांनी सहभाग नोंदवला होता. यामुळे पिंपरी चिंचवडच्या नावलौकिकात नेमबाजीमध्ये आता भर पडली आहे.
पिंपरी चिंचवडच्या आकुर्डी येथील अरुण पाडुळे स्पोर्ट्स फौंडेशन नेमबाजी प्रशिक्षण केंद्रातील साईराज नवनाथ पारखी सब युथ गटात 400 पैकी 347 व वेदांत वसंत बाबर सब यूथ गटात 400 पैकी 349 गुण मिळवत दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले.
खडकी येथे नुकत्याच झालेल्या युनिव्हर्सिटी स्पर्धेत अनुष्का बाबर हिने 10 मीटर पिस्तुल प्रकारात 400 पैकी 373 गुण मिळवत सुवर्णपदकाची कमाई केली. सर्व स्तरांतून या खेळाडूंचे कौतुक होत आहे.
आंतराष्ट्रीयस्तरावर पिंपरी-चिंचवडचे नावलौकिक व्हावे…
निवड झालेले सर्व खेळाडू हे अरुण पाडुळे स्पोर्ट् फाऊंडेशनचे प्रमुख प्रशिक्षक अरुण पाडुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत. आतापर्यंत त्यांच्या मार्गदर्शनाखाली 20 ते 25 राष्ट्रीय खेळाडू घडले आहेत. पाडुळे स्वतः राष्ट्रीय खेळाडू असून, पिंपरी-चिंचवडमधून नेमाबाजीत जास्तीत जास्त खेळाडू सहभागी होऊन राष्ट्रीय व आंतराष्ट्रीय स्तरावर पिंपरी-चिंचवडचे नेमाबाजीत नाव मोठं करण्यासाठी प्रयत्नशिल आहेत.