कोयता भिरकावत या भागातील भाई असल्याचे म्हणत खंडणी मागणाऱ्यास अटक
पिंपरी l प्रतिनिधी
हातातील कोयता भिरकावत ‘मी या परिसरातील भाई आहे. मला सर्वांनी खंडणी द्यायची’ असे म्हणून तरुणाने परिसरात दहशत निर्माण केली. तसेच वाहनांची तोडफोड केली. ही घटना बुधवारी (दि. 20) मध्यरात्री रहाटणी येथे घडली.
सौरभ विकास साठे (वय 20, रा. गुलमोहर कॉलनी, रहाटणी. मुळगाव खंडेश्वरी, ता. जि. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. काळू शिवराम गबाले (वय 29, रा. साई कॉलनी, रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री पावणे एक वाजताच्या सुमारास आरोपी साठे हा आरडा-ओरडा करत हातात कोयता घेऊन साई कॉलनी, रहाटणी येथे आला. मी रहाटणीचा भाई आहे. मला सर्वांनी हप्ता द्यायचा. नाहीतर एका एकाला मारून टाकेल, असे तो ओरडत होता. आरोपीने फिर्यादी यांना पाहिल्यावर त्यांच्या जवळ आला फिर्यादीची मानगुट पकडुन म्हणाला, ‘माझं नाव सौरभ साठे आहे. मी रहाटणीचा भाई आहे. मला तुम्ही सर्वांनी हप्ता द्या’, असे म्हणून फिर्यादी यांच्याकडे एक हजार रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाहीत तर तुला जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. फिर्यादी गबाले यांनी आपल्याकडे पैसे नाहीत असे सांगितले. तेव्हा आरोपी साठे याने हातातला कोयता फिर्यादी गबाले यांना मारला. फिर्यादी यांनी वार चुकवला. त्यानंतर आरोपीने कॉलनीमध्ये लावलेल्या एकूण सात वाहनांच्या काचा फोडून नुकसान केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.