breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

वेरुळ लेण्यांसमोरील कीर्तीस्तंभ हटवण्याची पुरातत्व विभागाची मागणी; जैन समाजाचा विरोध

वेरुळ |

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा वेरुळ लेण्यांच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर उभारलेला भगवान महावीरांच्या शिकवणीचे प्रतिनिधित्व करणारा जैन कीर्ती स्तंभ हटवण्याची किंवा स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे. ही मागणी मागे न घेतल्यास आंदोलन करण्याचा इशारा जैन समाजाने दिला आहे. त्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, औरंगाबाद परिमंडळाच्या एएसआयने अनेक कारणे सांगून जैन कीर्ती स्तंभ हटवण्याची किंवा स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे. वेरुळ येथील लेणी देशातील तीन धर्मांचे (हिंदू, जैन आणि बौद्ध धर्म) प्रतिनिधित्व करतात, तर स्तंभ त्यापैकी फक्त एकाचे प्रतिनिधित्व करतो. जागेवरील फेरीवाले आणि अतिक्रमणांमुळे रहदारीमध्ये अडथळा निर्माण होतो आणि स्तंभ मुख्य प्रवेशद्वारावर असल्याने अडथळा येत आहे. ज्या जागेवर हा स्तंभ उभारण्यात आला आहे, त्या जागेचे सर्वेक्षण करण्यात आले असून परवानगी न घेता याची उभारण्यात आली आहे, असे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने म्हटले आहे.

जैन समाजाच्या सदस्यांच्या मते, भगवान महावीरांच्या २५०० व्या निर्वाण महोत्सवानिमित्त १९७४ मध्ये लेण्यांच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुमारे ४८ वर्षांपूर्वी कीर्तीस्तंभ बांधण्यात आला होता. शांतता, सत्य आणि अहिंसेचे प्रतीक म्हणून असे अनेक स्तंभ देशभरात उभारण्यात आले, असेही सदस्यांनी म्हटले आहे. ‘जिओ और जिने दो’ असा संदेश या कीर्तीस्तंभावर आहे. दोन वर्षांपूर्वी वेरूळच्या श्री पार्श्वनाथ ब्रह्मचर्याश्रम जैन गुरुकुलच्या वतीने आठ लाख रुपये खर्च करून स्तंभाचे सुशोभीकरण करण्यात आले. त्यावर ग्रॅनाइट आणि स्तंभाच्या शिखरावर वेळ आणि तापमान सांगणारे घड्याळ बसवण्यात आले होते. हा स्तंभ अहिंसा, प्रेम, क्षमा, करुणा याचे प्रतीक असल्याचे येथे नमूद आहे.

“स्तंभ बांधण्यात आला असल्याने, समाजातील लोक त्याची देखभाल करतात. प्रत्येक महावीर जयंतीला आपण स्तंभाजवळ जमतो आणि ध्वजारोहणानंतर मिरवणूक काढतो. हे केवळ शांततेचे प्रतीक आहे आणि कोणालाही त्यात अडचण येऊ नये. ते का काढायचा किंवा स्थलांतरित करायचा आहे हे आम्हाला माहीत नाही,” असे वेरूळच्या श्री पार्श्वनाथ ब्रह्मचर्याश्रम जैन गुरुकुलचे अध्यक्ष वर्धमान पांडे म्हणाले. जैन समाजाचे सदस्य बुधवारी औरंगाबाद परिमंडळाच्या अधिक्षक पुरातत्वशास्त्रज्ञांची भेट घेऊन स्तंभ न हटवण्याची विनंती करणारे पत्र देणार आहेत, असेही वर्धमान पांडे म्हणाले.

महाराष्ट्र भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थ संरक्षण महासभेचे सरचिटणीस महावीर ठोले म्हणाले, “हे पाऊल जैन समाज तसेच इतर नागरिक स्वीकारणार नाहीत. हे स्मारक शांतता आणि अहिंसेचा संदेश देते आणि वेरुळ येथे परदेशी पर्यटक येत असल्याने ते जगभरात पोहोचते. आम्ही विरोध करू आणि ते सध्याच्या जागेवरून काढू देणार नाही.” पुरातत्व विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांनी जैन समुदायाला पत्र लिहिले आहे आणि जिल्हा प्रशासनाशी देखील या विषयावर चर्चा केली आहे कारण स्तंभ लेण्यांच्या दृश्यात अडथळा आणतो आणि त्या जागतिक वारसा आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button