breaking-newsपुणेमहाराष्ट्र

‘डेक्कन क्वीन’मधील खानपानाची पंगत उठणार?

प्रवाशांचा संताप; रेल्वे महाव्यवस्थापकांकडे तक्रार

पुणे ते मुंबई दरम्यान रोजचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांची सर्वात लाडकी गाडी आणि ‘सेकंड होम’ म्हणून ओळख असलेल्या डेक्कन क्वीन अर्थात दख्खनच्या राणीतील खानपान व्यवस्थेची ऐतिहासिक ‘डायिनग कार’ काढून टाकण्याचा घाट मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून घातला जात आहे. त्याबाबतचा प्रस्तावही वरिष्ठांकडे ठेवण्यात आला आहे. मात्र, त्याबाबत प्रवाशांकडून प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत असून, प्रवासी संघटनांच्या वतीने मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीची दखल न घेतल्यास आंदोलनात्मक पवित्रा घेण्याचा इशाराही दिला आहे.

डेक्कन क्वीन १ जून १९३० साली सुरू करण्यात आली. तेव्हापासून तिला ‘डायनिंग कार’ आहे. स्वतंत्र ‘डायनिंग कार’ असलेली पहिली गाडी म्हणूनही डेक्कन क्वीनचा गौरव केला जातो. त्यामुळेच या गाडीची नोंद लिम्का बुकमध्ये झाली आणि तिला गुणवत्तेचे आंतरराष्ट्रीय मानांकनही मिळले. गेल्या नव्वद वर्षांपासून डेक्कन क्वीनची ‘डायनिंग कार’ आणि प्रवासी यांचे अनोखे नाते आहे. त्यातील कटलेट, आमलेटसह सर्वच खाद्यपदार्थ प्रचंड लोकप्रिय ठरले आहेत. त्यामुळे गाडीसह त्यातील ‘डायनिंग कार’ प्रवाशांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. अशातच ती काढून टाकण्याचा प्रस्ताव आल्याने प्रचंड रोष व्यक्त होत आहे.

डेक्कन क्वीनमधील खानपान व्यवस्था पूर्वी रेल्वेकडून चालविण्यात येत होती. त्यानंतर इंडियन रेल्वे केटिरग अ‍ॅण्ड टुरिझम कार्पोरेशनने ‘डायनिंग कार’चा ताबा घेतला आणि ती ठेकेदारांना चालविण्यासाठी दिली. ठेकेदारांकडून रेल्वेला रीतसर भाडे मिळते. त्यामुळे ‘डायनिंग कार’मधून रेल्वेला कोणत्याही प्रकारचा तोटा नाही. प्रवासात हॉटेलप्रमाणे बसून खाद्यपदार्थाचा आस्वाद घेता येत असल्याने प्रवासी तिला पसंती देतात. या सर्व जमेच्या बाजू असताना या प्रस्तावाबाबत रोष आहे. याबाबत योग्य तो निर्णय न घेतल्यास आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशारा प्रवाशांनी दिला आहे.

‘डायनिंग कार’काढायची कशाला?

पुणे- मुंबई दरम्यान प्रवाशांची संख्या वाढली आहे. अधिक प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी डेक्कन क्वीनची ‘डायनिंग कार’ काढून त्या जागी प्रवासी डबा जोडण्याचे नियोजन असल्याचे पुणे रेल्वेने प्रस्तावात म्हटल्याचे वरिष्ठ पातळीवरूनही स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, प्रवासी डबा लावण्यासाठी ‘डायनिंग कार’चा बळी कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आवश्यकता असल्यास १७ डब्यांची ही गाडी २४ डब्यांची करून अधिक प्रवाशांची वाहतूक करावी, असा मुद्दा रेल्वे प्रवासी ग्रुपने मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांकडे मांडला आहे.

डेक्कन क्वीनमधील ‘डायनिंग कार’ काढण्याचा पुणे विभागाचा प्रस्ताव आहे. काहीही कारण नसताना ऐतिहासिक ठेवा उद्ध्वस्त करण्याचा घाट घातला जात आहे. प्रवाशांना आंदोलन करण्यास भाग पाडणारा हा प्रकार आहे. आम्ही मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्याकडे याबाबत तक्रार दिली आहे. रेल्वे बोर्डाकडे प्रवाशांचे म्हणणे मांडण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. कोणत्याही स्थितीत आम्ही ‘डायनिंग कार’काढू देणार नाही.

– हर्षां शहा, रेल्वे प्रवासी ग्रुप अध्यक्षा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button