डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता तर आज देशाचे दोन तुकडे झाले असते!
विजय वडेट्टीवार यांची केंद्र व राज्य सरकारवर टीका

परभणी : देशभरात जातीला जातीशी आणि धर्माला धर्माशी लढवलं जात आहे. जर, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता, तर आज देशाचे दोन तुकडे करावे लागले असते. मंदिरातील दानपेटी काढल्या तर, त्या मंदिराची देखरेख न करता हे पुजारी पळून जातील असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी परभणीत केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
परभणीच्या ज्ञानोपासक महाविद्यालयाच्या मैदानावर आश्रय सेवाभावी संस्था व गगन मलिक फाउंडेशनच्या वतीने थायलंड येथील पंचधातूच्या सहाफुटी तथागत गौतम बुद्धांच्या मूर्ती वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, थायलंड येथील भिक्खू गगन मलिक यांच्यासह मोठ्या संख्येने बौद्ध समाज बांधवांची उपस्थिती होती. यावेळी मूर्ती वितरण झाल्यानंतर बोलतांना विजय वडेट्टीवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली.
तर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बौध्द धर्म स्वीकारण्यावरून वक्तव्य केले. जर, “डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला असता, तर आज देशाचे दोन तुकडे करावे लागले असते. असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले. एवढंच नाही तर त्यांनी थेट मंदिरातील पुजाऱ्यांनाही लक्ष केले. मंदिरातील दान पेट्या काढून घेतल्यास, मंदिरात असलेले पुजारी पळून जातील आणि मंदिराची देखरेख ही करणार नाहीत, असे वडेट्टीवार म्हणाले.