ताज्या घडामोडीपुणे

….आणि रुपाली चाकणकरांनी बालविवाह रोखला

पुणे| लग्नसराईच्या काळात अनेक बालविवाह होतात. बालविवाह प्रतिबंधक कायदा असूनही त्याची अंमलबजावणी नीट होत नसल्याने बालविवाह लावते जातात. कधी वधू-वर तर कधी पालकांच्या अज्ञानातून हे बालविवाह होतात. याची प्रशासनाला कधीकधी माहिती मिळत नाही. पण बऱ्याचशा बालविवाहांची माहिती प्रशासनाला कळाल्यानंतर ते रोखले देखील जातात. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने मावळमधील एक बालविवाह रोखला गेला.

रुपाली चाकणकर यांनी बाबतचा अनुभव शेअर केला आहे. २० मे रोजीची रात्रीची साधारणपणे ८ वाजताची वेळ… राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या मोबाईलवर एक संदेश आला की ‘ताई मावळ तालुक्यामधील येळसे गावामध्ये २२ मे रोजी एक बालविवाह होत आहे आणि आपणांस विनंती आहे की आपण तो थांबवावा. रुपाली चाकणकर यांनी क्षणाचाही विलंब न करता रात्रीच आयोगातील अधिकाऱ्यांना यावर कार्यवाही करण्याबाबतच्या सूचना दिल्या आणि स्वतः जातीने या प्रकरणामध्ये लक्ष देऊन होत्या.

त्यानंतर तातडीने आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ज्यांनी तक्रार दाखल केली होती त्यांच्याशी संपर्क केला. या प्रकरणाची माहिती जाणून घेतली. हा बालविवाह रोखण्यासाठी फक्त एकच दिवस अधिकाऱ्यांच्या हातात होता. पोलिसांना तात्काळ सूचना देणे देखील आवश्यक होते. परंतु मुख्य अडचण होती, की ज्या मुलीचा बालविवाह होणार आहे, तिचा शाळेचा दाखला मिळण्याचा. कारण अशी माहिती मिळाली होती की त्या मुलीचे वय हे १७ वर्ष आहे व तिच्या जन्माचा मुख्य पुरावा मिळाल्याशिवाय पोलिसांना निर्देश दिले जाऊ शकत नव्हते.

चाकणकरांचा पोलीस अधिक्षकांना फोन

आयोगाचे अधिकारी व जागरूक नागरिक यांनी एकमेकांच्या संपर्कात राहत सकाळी हा शाळेचा दाखला मिळवला आणि याच पुराव्याच्या आधारावर रुपाली चाकणकर यांनी पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांना याबाबत कल्पना दिली. अभिनव देशमुख यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेत संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना याबतीत योग्य ती कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या.

त्यानंतर पोलिसांनी गावातील प्रतिष्ठित नागरिकांसमोर मुलीला व तिच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन मुलीचे वय १८ होईपर्यंत लग्न न करण्याबाबत समज दिली व बालविवाह केल्यास मुलीच्या आरोग्यावर काय परिणाम होईल तसेच होणाऱ्या कायदेशीर कारवाई बाबतची माहिती दिली. यावेळी मुलीच्या कुटुंबीयांनी हा विवाह रद्द करण्यात आला.

बालविवाहाची मानसिकता समाजातून नष्ट व्हावी!

महाराष्ट्र राज्य महिला आयोग हा बालविवाह रोखण्याबाबत तसेच समाजातून ही मानसिकता नष्ट व्हावी यासाठी नेहमीच आग्रही भूमिका घेत असल्याचे रुपाली चाकणकर यांनी सांगितले. बालविवाह प्रथा ही महाराष्ट्रातून हद्दपार व्हावी व त्याबद्दल समाजामध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी जून महिन्यापासून राज्य महिला आयोगाच्या वतीने महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांमध्ये बालविवाहाचे प्रमाण सर्वाधिक आहे अशा ठिकाणी विशेष अभियान चालू करण्यात येणार असल्याची माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.

तसेच महाराष्ट्रामध्ये कोणत्याही ठिकाणी जर बालविवाह होत असल्याचे आढळून आल्यास राज्य महिला आयोगाच्या १५५२०९ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन चाकणकर यांनी यावेळी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button