ताज्या घडामोडीमहाराष्ट्रविदर्भ

अमरावतीत अजब लग्नाची गजब गोष्ट

वयाच्या 80 व्या वर्षी आजोबा थेट बोहल्यावर

अमरावती: शरीराने म्हातारपण आलं तरी मनानं मात्र कोणी म्हातारं होत नसतं. मन हे नेहमीच तरूण असतं. त्याचाच प्रत्यय अमरावतीच्या चिंचोली रहिमापूर इथे अनुभवायला भेटतोय. या गावात वयाच्या 80 व्या वर्षी आजोबा थेट बोहल्यावर चढले. विशेष म्हणजे त्यांचा बोहल्यावर चढण्याचा हट्ट त्यांच्या 50 वर्षाच्या लेकाने पुर्ण केला. बरं लग्न पण असं की आजोबाच्या लग्नात, त्यांची पोरं-बाळं नातवंड सुना सर्वांनीच हजेरी लावत एकच धम्माल केली. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत या लग्नाची ही गरमा गरम चर्चा सर्वत्र सुरू आहे.

80 वर्षाचा नवरा 65 वर्षाची नवरी
विठ्ठल खंडारे हे अंजनगाव सुर्जी तालुक्यातल्या चिंचोली रहिमापूरचे रहिवासी. त्यांचे वय 80 वर्षाचे आहे. त्यांच्या पत्नीचे तीन वर्षापूर्वी निधन झालं. त्यांना चार मुलं आहेत. मुली, नातवंड, नातसुना असा त्यांचा मोठा परिवारही आहे. येवढा मोठा परिवार असला तरी त्यांना पत्नीच्या निधनामुळे एकटेपणा जाणवत होता. त्यामुळे आपल्याला आधार देणारं हक्काचे माणूस असावे असं त्यांना वाटू लागले. त्यामुळे त्यांनी दुसरे लग्न करण्याचे ठरवले. त्यांनी ही इच्छा आपल्या मुलाला बोलून दाखवली. हे ऐकून मुलगा हैराण झाला. त्याने वडीलांच्या या निर्णयाला विरोध केला. पण वडीलांनी लग्न करण्याचा हट्टचं धरला. शेवटी नाईलाज म्हणून मुलानेही वडीलांच्या लग्नास होकार भरला.

नवरी मुलीचा शोध सुरू
लग्न करण्याचा निर्णय ठरला. पण आता मोठी समस्या होती. ती म्हणजे नवरी मुलगी आणायची कुठून. त्यात वडीलांचे वय 80.अशा स्थितीत मुलगी कोण देणार हा प्रश्न होता. विठ्ठल आजोबांच्या मुलाने मुलगी शोधण्यास सुरूवात केली. पण मुलगी मिळणे अवघड होते. पण शोध कायम होता. शेवटी तो शोध अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये येऊन संपला. इथे आजोबां बरोबर लग्न करण्यासाठी एक महिला तयार झाली. त्याचं वय होतं 66 वर्ष. त्यांनी लग्नास होकार दिला आणि एकाचं विठ्ठल खंडारे यांचे लग्न ठरलं.

मुलं सुना नातवंडांनी लग्न गाजवलं
अकोला जिल्ह्यातील अकोट येथील 66 वर्ष वयाच्या महिलेसोबत लग्न लावून देण्याचा निर्णय झाला. यानंतर 8 मे ला चिंचोली रहिमापूर या गावात विठ्ठल खंडारे यांचे मोठ्या थाटात लग्न लावण्यात आले. यावेळी खंडारे कुटुंबाचा उत्साह जोरदार होता. वयाच्या 80 व्या वर्षी लग्न करणाऱ्या वडीलांची वरात गावातून काढण्याचा निर्णयही त्यांच्या मुलाने घेतला. मग काय वाजत गाजत विठ्ठल यांची वरातही काढण्यात आली. वरातील लेकासह नातवंडांनीही ठेका धरला. हे पाहून नवरदेव आजोबांनाही रहावलं नाही. मग काय त्यांनीही डान्स करत आपली नाचण्याचीही हौस भागवून घेतली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button