breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयआरोग्यटेक -तंत्रताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशमुंबईराजकारणराष्ट्रिय

राज ठाकरेंकडून युतीचे संकेत; फडणवीस अन् शिंदेंसोबत येणार एकाच मंचावर

मुंबई । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं युतीचं सरकार सत्तेवर आल्यापासून नवीन समीकरणं उदयास येत असल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे राज ठाकरेंची मनसे आणि शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्येही जवळीक असल्याचं समोर येत आहे. आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. दिवाळी निमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही दादरमधील शिवाजी पार्क येथे मनसेनं दीपोत्सवाचे आयोजन केले आहे. विशेष म्हणजे त्या दीपोत्सवाला उपस्थित राहण्यासाठी राज ठाकरेंनी शिवाजी पार्कमधील शेजाऱ्यांना समस्त दादरकर आणि मुंबईकरांना आवाहनही केले आहे.

राज ठाकरेंनी एक पत्र लिहिलं आहे, पत्रात राज ठाकरे म्हणतात, सस्नेह जय महाराष्ट्र! दिवाळीचा उत्साह सर्वत्र दिसू लागला आहे. गेली काही वर्ष कोरोनामुळे दिवाळी थोडी झाकोळलेली होती, परंतु यावेळेस दिवाळीच्या निमित्ताने वातावरणात पुन्हा उत्साह, आनंद दिसतोय. दिवाळी आणि शिवतीर्थ परिसरातली रोषणाई, म्हणजेच ‘दीपोत्सव’ हे गेल्या १० वर्षांपासून जणू समीकरणच बनलं आहे. दरवर्षी आपण शिवतीर्थावर तिथल्या रस्त्यांवर, झाडांवर रोषणाई करतो. कोरोनाच्या २ वर्षांत सुद्धा आपण त्या परंपरेत खंड पडू दिला नव्हता. यावर्षी देखील आपण ही रोषणाई करून दिवाळीचा आनंद साजरा करणार आहोतच. त्या दीपोत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी हे पत्र लिहितो आहे.

दीपावलीच्या निमित्ताने आपण आपलं घर, आपलं अंगण आणि आपला परिसर दिव्यांनी उजळवून टाकतो. दादरमधील हा शिवतीर्थाचा परिसर हे मी माझ्या घराचं अंगणच समजतो म्हणून हे अंगण तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि सहभागानं विविध रंगी लखलखणाऱ्या दिव्यांच्या रोषणाईनं आणि इतर सजावटीनं आपण उजळवून टाकणार आहोत. मला तर वाटतं की प्रत्येकानं आपल्या घराबरोबर आपलं अंगण आणि आपला परिसर असाच सुंदर ठेवला, तर महाराष्ट्र जगाला हेवा वाटेल, असा होईल. हे करण्यामागेही माझी तीच भावना आहे.

वसुबारसेपासून २१ ऑक्टोबर २०२२ पासून ते तुळशीच्या लग्नापर्यंत ८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत हा दीपोत्सव साजरा होणार आहे. यावर्षी वसुबारसेला म्हणजे २१ ऑक्टोबरला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपण दीपोत्सवाचं उद्घाटन करणार आहोत. आपण अवश्य यावे, आपल्या कुटुंबातील सर्वांना घेऊन या. मित्र मंडळींना सांगा. आनंद आपण एकट्याने साजरा करत नाही. त्यात जितकी आप्त, मित्रमंडळी सहभागी होतील तितका त्या सोहळ्याचा आनंद वाढत जातो. तुम्ही तर याच, पण इतरांनाही आवर्जून सांगा. आपल्या सर्वाचा, राज ठाकरे, असं त्यांनी पत्रात लिहिलं आहे. विशेष म्हणजे या पत्रात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपण दीपोत्सवाचं उद्घाटन करणार असल्याचंही अधोरेखित केलं आहे. त्यामुळे पुन्हा राज्यात नवी युती पाहायला मिळणार का हे लवकरच समजणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button