breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रराजकारण

लोकप्रियता खुपत असल्याने भ्रष्टाचाराचे आरोप- उदयनराजे भोसले

सातारा |

सामान्य जनतेकरिता आजपर्यंत आमचे जीवन व्यतीत केल्याने आमची जनमानसात वेगळी प्रतिमा आहे. आमची लोकप्रियता खुपत असल्याने कथित भ्रष्टाचाराचे मोघम, बिनबुडाचे आरोप करण्यात येत असून, त्यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलटय़ा बोंबा असल्याची प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाव्दारे करत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसलेंचा नामोल्लेख टाळत टीका केली. त्यांनी रिअल इस्टेटमध्ये असणाऱ्या व्यक्तींनी आजपर्यंत फक्त स्वत:चा स्वार्थ साधला असून, त्यांना दुसऱ्याची लोकप्रियता सहन होत नसल्याचेही पत्रकात नमूद केले आहे. आमदार भोसले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार उदयनराजे भोसले यांच्या इनोव्हेटिव्ह सातारा या संकल्पनेवर टीका केली होती.

या टीकेला उत्तर देण्यासाठी काढलेल्या पत्रकात उदयनराजेंनी म्हटले आहे की, लोकांना गतिमान सुविधा आणि सोयी पुरविणे हे आमचे कर्तव्य आहे. लोकहिताची अंमलबजावणी करणे हा भ्रष्टाचार असेल, तर होय, आम्ही भ्रष्टाचार केलाय. स्वार्थ, भ्रष्टाचारात अखंड बुडालेल्यांनी आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणे म्हणजे चोराच्या उलटय़ा बोंबा आहेत. इनोव्हेटिव्ह सातारा ही योजना समाजहिताची आहे. ज्यांना त्याचा अर्थ आणि स्पेलिंग सांगता येणार नाही, त्यांनी आमच्या इनोव्हेटिव्ह सातारा यावर बोलू नये.

सहकाराचा गळा घोटून स्वाहाकार करून रिअल इस्टेटमध्ये कार्यरत असणाऱ्यांनी आजपर्यंत फक्त स्वत:चा स्वार्थ पाहिला आहे. मी नेहमी समाजासाठी जगत असून, माझ्याविरोधात बोंबा मारणाऱ्यांना समाजाने पुरते ओळखले आहे. दोन बँकांचे विलीनीकरण करत उजळमाथ्याने फिरणाऱ्यांचा श्वाश्वत विकास नागरिकांनी पाहिला असून, त्यांच्या पोटात एक आणि ओठात एक असते. याचा अनुभव अनेकांनी घेतल्याची टीकाही उदयनराजेंनी पत्रकात केली आहे. आमच्यावर आरोप करायचे असतील, तर त्यांनी पुराव्यानिशी चारचौघांत चर्चेला सामोरे यावे. खऱ्याला कधीच मरण नसते आणि हा सूर्य आणि हा जयद्रथ करायला मी कधीही घाबरणार नसल्याचे आव्हानही उदयनराजे यांनी शिवेंद्रसिंहराजे यांना नाव न घेता दिले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button