breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

शरद पवारांना आलेल्या धमकीनंतर अजित पवार आक्रमक; म्हणाले,..

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी आल्याप्रकरणी खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने आज मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार म्हणाले की, पवार साहेबांना सोशल मिडियावर ‘तुमचा लवकरंच दाभोळकर होणार…’ अशी देण्यात आलेली धमकी, हे गंभीर प्रकरण आहे. केंद्र आणि राज्य सरकारनं या धमकीची गांभीर्यानं दखल घेऊन आरोपींना तातडीनं गजाआड करावं. धमकी मागचा खरा मास्टरमाईंड शोधावा. अशा विचारांच्या समाजविघातक शक्तींना वेळीच रोखावं, हेच राज्याच्या हिताचं असेल.

हेही वाचा – संजय राऊतांना आलेल्या धमकीवरून नितेश राणे यांची जोरदार टीका; म्हणाले, मच्छर मारण्यासाठी..

पवार साहेबांचं संरक्षण करण्यास महाराष्ट्रातील जनता समर्थ आहे. परंतु डॉ. दाभोळकरांची हत्या करणाऱ्या शक्ती राज्यात पुन्हा सक्रिय झाल्या आहेत, ही बाब अधिक चिंताजनक आहे. निवडणुका जवळ येऊ लागल्यानं यापुढे जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषावादाचे असे मुद्दे उपस्थित करुन समाजात द्वेष निर्माण करण्याचे, दुही माजवण्याचे, मतांच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न होतील. ते हाणून पाडले जातील. देशातील जनता आता सावध आहे. समाजात द्वेष निर्माण करणाऱ्यांच्या भूलथापांना भुलणार नाही. कुणाच्याही कटकारस्थानांना बळी पडणार नाही, असं अजित पवार म्हणाले.

शेतकऱ्यांचे प्रश्न, कष्टकऱ्यांच्या समस्या, महिलांवरील अत्याचार, वाढती महागाई, वाढती बेरोजगारी याच मुद्यांवर यापुढे महाराष्ट्र ठाम राहील. विकासाच्या मुद्यांवरुन महाराष्ट्राची जनता आता तसूभरही बाजूला हटणार नाही. आदरणीय पवार साहेबांना सोशल मिडियावरुन देण्यात आलेली जाहीर धमकी गंभीर मुद्दा असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याची गांभीर्यानं दखल घ्यावी, या मागणीचा मी पुनरुच्चार करतो, असंही अजित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button