breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

‘प्रभू श्री राम महाराष्ट्र व उत्तर प्रदेश यांना जोडणारा आद्य सेतू’; राज्यपाल रमेश बैस

राजभवन येथे ‘उत्तर प्रदेश राज्य स्थापना दिवस’ साजरा

मुंबई : महाराष्ट्र व उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये पौराणिक काळापासून संबंध आहेत. प्रातः स्मरणामध्ये लोक काशी विश्वेश्वरासह त्र्यंबकेश्वराचे स्मरण करतात. अयोध्येत जन्मलेल्या प्रभू श्री रामांनी पंचवटी येथे वास्तव्य केले होते. त्यामुळे प्रभू श्री राम हे उत्तर प्रदेश व महाराष्ट्र यांना जोडणारा आद्य सेतू आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. उभय राज्यातील लोकांनी परस्परांच्या राज्यांना भेटी दिल्यास त्यातून राष्ट्रीय एकात्मता दृढ होईल असे राज्यपाल रमेश बैस सांगितले.

राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत आज राजभवन मुंबई येथे ‘उत्तर प्रदेश राज्य स्थापना दिवस’ साजरा करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमांतर्गत यावर्षी राजभवनात ‘उत्तर प्रदेश राज्य स्थापना दिवस’ साजरा करण्यात आला.

महाराष्ट्रातील लोकांकरिता अनेक वर्षे काशी हे अध्ययन केंद्र होते. भारतीय स्वातंत्र्यलढ्यात उत्तर प्रदेशातील क्रांतिकारकांचे मोठे योगदान होते. उत्तर प्रदेशाने देशाला प्रधानमंत्री दिले आहेत. तसेच कला, संस्कृती, साहित्य, रंगभूमी या क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व दिले आहेत.

देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशचा विकास झाला, तर देशाचा विकास होईल. त्यामुळे प्रधानमंत्र्यांचे उत्तर प्रदेशच्या विकासावर विशेष लक्ष आहे, असे नमूद करून, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रम यशस्वी करण्यासाठी लोकांनी उत्तर प्रदेशला भेट द्यावी तसेच उत्तर प्रदेशातील लोकांनी देखील महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव पाहावे असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी केले.

आद्य शंकराचार्यांनी चार दिशांना चार धर्मपीठे स्थापन केली. धार्मिक पर्यटनाच्या निमित्ताने लोक भाषा, बोली, संस्कृती व खानपान समजून घेऊ लागले. या माध्यमातून देश सांस्कृतिक एकसूत्रात बांधला गेला, असे सांगून ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ हा केवळ शासकीय कार्यक्रम नसून तो देशाला जोडण्याचा स्तुत्य प्रयत्न आहे, असे राज्यपाल रमेश बैस यानी सांगितले.

हेही वाचा – पंतप्रधान मोदींची नवीन घोषणा! एक कोटी घरांवर सोलर सिस्टीम बसवण्यात येणार

कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. अपूर्वा पालकर, कौशल्य, रोजगार, उद्यमशीलता व नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी तसेच राज्य कौशल्य विद्यापीठाचे विद्यार्थी, शिक्षक व कलाकार उपस्थित होते.

यावेळी राज्य कौशल्य विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी उत्तर प्रदेशच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी कथक नृत्य, कजरी, ब्रज की होली व रामलीला सादर केले. तेजल चौधरी हिने यावेळी कथक नृत्य सादर केले. राज्यपाल रमेश बैस यंच्या हस्ते सहभागी कलाकारांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी उत्तर प्रदेशच्या सामाजिक, सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडवणारा लघु माहितीपट दाखविण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button