TOP Newsताज्या घडामोडीपुणे

चांदणी चौकातील अतिरिक्त मार्गिका सुरू

पुणे : चांदणी चौकातील वाहतूक कोंडीची समस्या कमी करण्यासाठी मुंबईकडून साताऱ्याकडे जाण्यासाठी चार मार्गिका, तसेच साताऱ्याकडून मुंबईकडे जाण्यासाठी तीन मार्गिका शुक्रवारपासून सुरू झाल्या. त्यामुळे कोंडीची समस्या काही प्रमाणात कमी झाल्याचा दावा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (नॅशनल हायवेज अथोरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) करण्यात आला.

चांदणी चौकात जुन्या पुलाखाली महामार्गाला दोन्ही बाजूला जाण्यासाठी दोन मार्गिका होत्या. त्यामुळे तेथे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत होती. त्यामुळे त्या ठिकाणी पूल पाडण्याचा, तसेच तेथे सेवा रस्ते वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी एनएचएआयकडून ३९७ कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला. अद्याप तीन ठिकाणी भूसंपादन झालेले नाही. त्यामुळे, तेथील सेवा रस्त्याची कामे रखडली आहेत. वेदभवन येथील भूसंपादन न झाल्याने, कोथरूडकडून महामार्गाच्या खालून मुळशीकडे जाणारा भुयारी मार्ग करता येत नाही, असे एनएचएआयचे प्रकल्प संचालक एस. एस. कदम यांनी सांगितले.

चांदणी चौकातील जुना पूल २ ऑक्टोबरला पाडल्यानंतर, त्या दिवशी सकाळी दहा वाजता तेथील वाहतूक सुरळित करण्यात आली. मात्र, महामार्गावर पुलाखाली मार्गिका कमी असल्याने, तेथील वाहतुकीची कोंडी कायम राहिली. सेवा रस्त्यासाठी व नवीन पुलाच्या कामासाठी खडक फोडण्याचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे खडक फोडण्याच्या वेळी कधी वाहतूक बंद करावी लागल्यास, वाहनांच्या रांगा लागत होत्या. तेथील सेवा रस्त्याचे काम येत्या महिन्याभरात पूर्ण होण्याची शक्यता आहे, त्यानंतर, या भागात वाहनांसाठी जादा लेन उपलब्ध होतील. त्यानंतर, येथील वाहतुकीची कोंडी दूर होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button