breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक मोहिमेत ३२ परवाना कक्ष अनुज्ञप्तीवर कारवाई

पुणे | कल्याणीनगर पुणे येथील अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून मागील तीन दिवसात १४ पथकांमार्फत राबविण्यात आलेल्या धडक मोहिमेत ३२ विविध परवाना कक्ष अनुज्ञप्तीवर गुन्हे दाखल केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार या अनुज्ञप्तींचे व्यवहार तात्काळ प्रभावाने बंद ठेवण्यात आले असून सर्व अनुज्ञप्ती सील करण्यात आलेल्या आहेत.

या कारवाईत १० रूफटॉप, अंदाजे १६ पब, इतर ६ परवाना कक्ष बार अशा एकूण ३२ अनुज्ञप्तींचे व्यवहार तात्काळ प्रभावाने बंद ठेवण्याचे आदेश पारित केले असून सर्व अनुज्ञप्ती सील करण्यात आलेल्या आहेत. जिल्हाधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त, उपआयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यात धडक मोहिम राबविण्यात येत आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागांकडून वारंवार अनुज्ञप्तींच्या गैरव्यवहाराबाबत कारवाई करण्यात येते. कोझी बारवर आता अनुज्ञप्तीचे व्यवहार बंद केल्याची कारवाई केलेली असली तरी दोन महिन्यापूर्वीही राज्य उत्पादन शुल्क विभागाने विभागीय गुन्हा नोंद केलेला आहे.
२०२३-२०२४ मध्ये राज्य उत्पादन शुल्क पुणे विभागाकडून एकूण २९७ अनुज्ञप्तीवर विविध कारणांसाठी गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये १ कोटी १२ लाख रुपये इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे. १७ अनुज्ञप्तींवर निलंबनाची कारवाईदेखील करण्यात आली असून २ अनुज्ञत्या कायमस्वरुपी बंद करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा     –      ‘व्हायरल झालेला रॅपचा व्हिडीओ माझ्या मुलाचा नाही’; अल्पवयीन मुलाची आई कॅमेरासमोर ढसाढसा रडली 

एप्रिल २०२४ पासून आजतागायत ५४ अनुज्ञप्त्यांवर गुन्हे नोंद करण्यात आलेले असून ५ लाख रुपये इतका दंड वसुल केलेला आहे. यात एकूण ३२ अनुज्ञप्त्या सील करण्यात आलेल्या आहेत.

राज्य उत्पादन शुल्क विभाग नियोजनबद्ध कारवाई करीत असून अनुज्ञप्ती विहीत वेळेनंतर सुरू ठेवणे, अल्पवयीन मुलांना मद्यविक्री करणे, अवैध ठिकाणांवर (रुफटॉपवर) मद्यविक्री करणे या बाबत सर्व पथकांकडून तपासणी मोहिम सुरू आहे.

विभागाकडे मद्यसेवन परवाने मुबलक प्रमाणात उपलब्ध असून ऑनलाईन पद्धतीनेही exciseservices.mahaonline.gov.in या संकेतस्थळावरून देखील मद्यपरवाने देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. वरील गैरव्यवहारासंदर्भात नागरिकांच्या तक्रारी असल्यास टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ किंवा व्हॉटसअप क्रमांक ८४२२००११३३ वर तक्रार देण्याचे आवाहान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांनी केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button