breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणलेख

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनंतर महाराष्ट्राला प्रखर हिंदुत्त्ववादी नेता मिळाला…कोण वाचा?

महाईन्यूज । लोकसंवाद । अधिक दिवे

शिवसेना स्थापन झाली तेव्हा सुरुवातीला त्याचे स्वरूप मराठी तरुणांच्या न्याय्य हक्काकरिता लढणारी सामाजिक व सांस्कृतिक संघटना असे होते. ठाकरे यांना वडिलांकडून समाजवादी विचारसरणीचा वारसा लाभला होता. त्यामुळे ठाकरे हे कधी भांडवलदारांवर टीका करीत. ठाकरे यांनी एकेकाळी जनसंघावरही कोरडे ओढले होते. आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना आरक्षण असले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी वेळोवेळी घेतली. त्याच ठाकरे यांनी बाबरी मशिद पाडणारे जर माझे शिवसैनिक असतील तर त्याचा मला अभिमान आहे, असेही म्हटले होते व मशिद पडल्यावर तेथे अत्याधुनिक हॉस्पिटल उभारा, अशी भूमिकाही घेतली होती. त्यामुळे ठाकरे यांच्या हिंदुत्त्ववादी नेता म्हणून दरारा देशभर वाढला.

मराठीच्या मुद्द्यामुळे शिवसेनेला लोकप्रियता लाभली तर हिंदुत्वाच्या मुद्द्यामुळे शिवसेनेला ‘इलेक्टीव्ह मेरिट’ लाभले. पाकिस्तानबरोबर सामने खेळायला ठाकरे यांनी विरोध केल्याने शिवसैनिकांनी वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी उखडली होती. त्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद याला जेव्हा ठाकरे यांनी घरी बोलावले तेव्हा त्यांच्यावर टीका झाली होती. प्रखर हिंदुत्त्ववादी चेहरा असेलेले किंबहुना ‘हिंदुहृदयसम्राट’ अशी बिरुदावली लाभलेले बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर महाराष्ट्र किंबहुना भारतातील ‘हेवीवेट’ हिंदुत्त्ववादी नेता उदयाला आला नाही.

मात्र, एकेकाळी बाळासाहेबांसोबत सावली सारखे असणारे पुतणे तथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी आता आपली राजकीय वाटचाल हिंदुत्त्ववादी विचारांनी सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्या राज यांनी पक्षाचा झेंडा बदलला. झेंड्यातील हिरवा आणि पांढरा रंग काढून टाकण्यात आला. नव्या झेंड्यामध्ये केवळ भगवा रंग दिसतो. (भगवा रंग हिंदुत्त्वाची निशाणी आहे). विशेष म्हणजे, मनसेच्या झेंड्यावर शिवमुद्रा (हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवमुद्रा) कोरण्यात आली आहे. त्यामुळे आगामी काळात मनसेची राजकीय दिशा कोणती असणार? हे महाराष्ट्रासह देशभरातील नागरिकांच्या लक्षात आलेच होते.

पुण्यातून निघाला मनसेचा पहिला हिंदुत्त्ववादी हुंकार …

कार्यकर्ता महाअधिवेशनाच्या काळात पुण्यात मनसेकडून शहरभर बॅनरबाजी करण्यात आली. ज्यात ‘चले जाव…हा हिंदुस्थान आहे. बांग्लादेश किंवा पाकिस्तान नाही’, असा इशारा दिला आहे. ‘एनआरसी’चं राज ठाकरे यांनी समर्थन केल्यानंतर त्यांनी बदलेला झेंडा याचा स्पष्ट अर्थ हा त्यांच्या बदलेल्या भूमिकेची मांडणी करत होता. देशात हिंदुत्व आणि राज्यात मराठी हा मनसेचा अजेंडा असणार आहे, हे त्याचवेळी स्पष्ट झाले होते. पाकिस्तानी आणि बांग्लादेशी चले जाव…असे फलक पुण्यात यापूर्वीच झळकले होते. तोच मुद्दा घेत राज ठाकरे यांनी रविवारी आझाद मैदानावर आपली थेट भूमिका स्पष्ट केली.

कार्यकर्ता महाअधिवेशनात ‘टॅगलाईन’ ठरली सूचक…

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २३ जानेवारी २०२० रोजी म्हणजे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनी मुंबईत पक्षाचं अधिवेशन घेतले. त्याचवेळी राज ठाकरेंनी हिंदुत्त्वाच्या अनेक संकेत दिले. या अधिवेशनाच्या आमंत्रणाची टॅगलाईन होती – ‘विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा’.  याच अधिवेशनात मनसेचा झेंडा म्हणून ‘शिवमुद्रा’ असलेला भगवा झेंडा स्वीकारला आणि अधिवेशनातील भाषणही हिंदुत्वाची दिशा घेणारे ठरले. यासह अधिवेशनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा पूजन करुन राज यांनी प्रखर हिंदुत्त्ववादी भूमिकेचे संकेत दिले होते.

***

आक्रमक राज ठाकरे…तर तलवारीला तलवारीने उत्तर..!

बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हाकलण्याच्या मागणीसाठी राज ठाकरे यांनी मुंबईत महामोर्चा काढला. त्याला महाराष्ट्रातील मनसैनिक आणि हिंदुत्त्ववादी विचारांच्या लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या मोर्चाच्या माध्यमातून राज यांनी ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’चे समर्थन केले आहे.  ‘सीएए’ आणि ‘एनआरसी’ याविरोधात मोर्चा काढणाऱ्यांवर राज यांनी सडकून टीका केली. ‘‘यापुढं नाटकं कराल तर दगडाला दगडानं आणि तलवारीला तलवारीनं उत्तर दिलं जाईल!’’ असेही राज यांनी ठणकावले. मुस्लिमांनी सीएएविरोधात काढलेल्या मोर्चाचा अर्थच लागलेला नाही. जन्मापासून इथं राहणाऱ्यांना कुणीही बाहेर काढणार नाही. मग मोर्चे काढून ताकद कुणाला दाखवता? असा सवालही उपस्थित केला. बाहेरच्यांना हाकललंच पाहिजे त्यात कुठेही तडजोड केली नाही पाहिजे. कुणीही येतात कुठेही राहतात. भारताने माणुसकीचा ठेका नाही घेतलेला नाही. माझा देश म्हणजे काय धर्मशाळा वाटली काय, अशा शब्दात राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला.

 अशाच प्रकारे बाळासाहेब ठाकरे यांनीही अनेकदा घुसखोरांविरोधात कडवट भूमिका घेतली होती. बाळासाहेबांच्या निधनानंतर महाराष्ट्रातून देशातील हिंदुत्त्वाला साद घालणारा नेता उदयाला आला नाही. मात्र, ही पोकळी आता राज ठाकरे भरुन काढतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

**

राज ठाकरे यांना हवेय सावरकरांचे हिंदुत्त्व…?

राज ठाकरे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे हिंदुत्त्व अभिप्रेत आहे., असेच त्यांच्या भूमिकेवरुन स्पष्ट होते. कार्यकर्ता महाअधिवेशनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा पूजन करुन तसे संकेत राज यांनी दिले. स्वा. सावरकरांनी १९२३ साली प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या ‘हिंदुत्व’ या ग्रंथात त्यांनी हिंदुत्ववादी विचारप्रणाली आणि हिंदू राष्ट्राची संकल्पना या दोहोंचे सविस्तर विवेचन केले आहे. या विवेचनात स्वा. सावरकरांनी हिंदू राष्ट्राची व्याख्या करताना या राष्ट्राचे नागरिकत्व कुणाला आणि कसे प्राप्त होते? आणि कोण त्यासाठी अपात्र ठरतो? हेही सांगितले आहे.

स्वा. सावरकरांनी या व्याख्येत असे म्हटले आहे की, सिंधू नदीपासून दक्षिणेस सिंधुसागरापर्यंत पसरलेली ही भूमी ज्यांची पितृभू आणि पुण्यभू आहे असेच लोक हिंदू राष्ट्राचे नागरिक होऊ शकतात. या व्याख्येतील ‘पुण्यभू’ हा शब्द सर्वात महत्त्वाचा आहे. या शब्दाचा अर्थ स्वा. सावरकर यांनी असा सांगितला आहे, की ज्यांचे धर्म, धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा, सणवार, संत, महात्मे या भूमीत जन्मलेले असले पाहिजेत. हिंदू राष्ट्राच्या नागरिकत्वाचा हा निकष इतका अभेद्य आहे की मुस्लीम, ख्रिश्चन, पारसी, ज्यू यांची ही पितृभू असली तरी ती पुण्यभू होऊ शकत नाही. पर्यायाने ते हिंदू राष्ट्राचे नागरिक होऊ शकत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी यावर भाष्य करताना असे म्हटले आहे की, ‘सावरकरांच्या हिंदू राष्ट्रात बिगरहिंदू केवळ दुय्यम नागरिक होऊ शकतात.’ ( संदर्भ : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे लेखन आणि भाषणे (इंग्रजी) खंड आठवा, पृ. १४२). हीच विचारप्रणाली स्वीकारून डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ च्या दसऱ्याच्या मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.

आता राज ठाकरे यांनी महामोर्चात ‘एनआरसी’ आणि ‘सीएए’ संदर्भात केलेल्या भाषणातील मुद्दे विचारात घेवूया…

  • सीएए आणि एनआरसी विरोधात देशभरात मुसलमानांनी जे मोर्चे काढले त्याचा मला अर्थ लागला नाही. जे जन्मापासून इथे राहतात त्यांना कोणी बाहेर काढत होते?
  • पाकिस्तान आणि बांग्लादेशी घुसखोरांना हाकाललेच पाहिजे.
  • पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तान येथील अल्पसंख्याकांवर धार्मिक अत्याचार होत असतील तर भारत त्यांना नागरिकत्व देईल. हा कायदा १९५५ सालचा हा कायदा आहे.
  • अयोध्येत राम मंदिरासाठी ट्रस्टनिर्माण झाले..त्यानंतर बळी गेलेल्या कारसेवकांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल.
  • पाकिस्तान हा टेरिरिस्टचा अड्डा झाला आहे. अमेरिकेतील टॉवर्स पाडले, तो ओसामा बिन लादेन पाकिस्तानमध्ये सापडला. भारतातील बॉम्बस्फोट झाले, त्यात माणसे मारली गेली, त्यामागे कोण होते?
  • मुंबईतील बॉम्बस्फोटमधील सूत्रधार दाउदला कोणी सांभाळले? पाकिस्ताननेच!
  • पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानमध्ये हिंदू अल्पसंख्य आहेत. त्यांना धार्मिक अत्याचार झाल्यास भारताचे नागरिकत्व द्यायचे नाही? एनआरसी आणि सीएएला विरोध करणारे म्हणतात की, मुसलमानांनाही घ्या…कसे घ्यायचे?
  • देशात १३५ कोटी लोकसंख्या आहे. त्याला अजून शिस्त लागत नाही. सीएएमध्ये गैर काय आहे?
  • माझा देश म्हणजे काय धर्मशाळा आहे का? कोणीही येते कुठेही राहतात. अनेक समस्या देशासमोर आहेत. त्यामध्ये घुसखोरांचा प्रश्नही संवेदशनशील आहे.
  • जगातील प्रत्येक देश त्या-त्या देशातील नागरिकत्वासाठी कठोर पावले उचलतात.

विशेष म्हणजे,

राज यांनी भाषणाची सुरूवात जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो आणि भगिनींनो अशी नव्‍हे, तर जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बाधवांनी आणि भगिनींनो …अशीच केली…

या सर्व निरीक्षणांवरुन स्पष्ट दिसते की, महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर हिंदुत्ववादी विचार देशभर पोहोचवणारा नवा चेहरा मिळाला आहे. आता ही जबाबदारी राज कशी पेलतात हे येणारा काळच ठरवणार आहे!

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button