ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मोबाईल दुकानातील अल्पवयीन मुलाला गोळी झाडून ठार मारणाऱ्या आरोपीला पिस्टल पुरवणारा साथीदार खंडणी विरोधी पथकाच्या जाळ्यात

पिंपरी चिंचवड | मोबाईल दुकानातील 16 वर्षीय मुलाला किरकोळ कारणावरून गोळी झाडून ठार मारल्याचा प्रकार 15 ऑगस्ट रोजी रात्री शिवराजनगर, रहाटणी येथे घडला. त्या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला पिस्टल पुरवणा-या साथीदाराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. अटक केलेला आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.शुभम महादेव खडसे (वय 21, रा. रेणुका माता मंदिराजवळ केशवनगर मुंढवा पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.15 ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास फिर्यादी इसाक इनामदार यांचा मुलगा ओवेज इसाक इनामदार (वय 16) हा फिर्यादी यांचा मेव्हणा शाहरुख सय्यद यांच्या शिवराजनगर, रहाटणी येथील एक्सपर्ट मोबाईल पॉईंट या मोबाईल रीपेअरिंग दुकानात थांबला होता. त्यावेळी त्याच्या तोंडओळखीचा मुलगा किरण शिवाजी वासरे (रा. रहाटणी) हा दुकानात आला. त्याने मोबाईलची चार्जर कॉड मागितली.त्यावेळी त्याच्या जवळ बंदूक होती. त्यामुळे ओवेज याने ‘बंदूक येथे कशाला आणली. तु येथुन जा. नाहीतर मी तुझी कंप्लेंट पोलीसांत करेन’ असे किरणला म्हटले. त्या कारणावरुन किरण याला राग आल्याने त्याने ओवेजला शिवीगाळ व दमदाटी करुन त्याच्याकडील बंदुकीने ओवेजच्या उजव्या छातीवर गोळी झाडून त्याचा खून केला. याप्रकरणी किरण वासरे याच्यासह त्याला शस्त्र पुरवणाऱ्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला होता.

खंडणी विरोधी पथकाचे उपनिरीक्षक महेंद्र पाटील आणि अंमलदार वाकड परिसरात गस्त घालत असताना काळेवाडी फाटा चौक येथे आल्यावर पोलीस अंमलदार आशिष बोटके व प्रदीप गोडांबे यांना माहिती मिळाली की, वाकड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी शुभम खडसे हा लिनियर गार्डन पिंपळे सौदागर पुणे येथे कोणाची तरी वाट पाहत थांबलेला आहे.त्यानुसार खंडणी विरोधी पथकाने लिनियर गार्डनजवळ सापळा लावून शुभम महादेव खडसे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार किरण शिवाजी वासरे याला एक देशी बनावटीचे पिस्टल दोन राऊंड दिले असल्याचे सांगितले. त्यानुसार त्याला अटक करून पुढील कारवाईसाठी वाकड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

आरोपी शुभम खडसे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात सन 2017 साली सांगवी आणि वाकड पोलीस ठाण्यात वाहन चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. तर जानेवारी 2021 मध्ये वाकड पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल आहे.ही कामगिरी पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त डॉ. प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, उपनिरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस अंमलदार सुनील कानगुडे, अशोक दूधावणे, किरण काटकर, आशिष बोटके, प्रदीप गोडांबे, संदीप पाटील, शैलेश मगर, अशोक गारगोटे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button