TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

बदलापूरची एसी लोकल अखेर आजपासून रद्द; प्रवाशांच्या आंदोलनानंतर रेल्वे प्रशासनाचा निर्णय

मुंबईः सामान्य लोकलच्या जागी धावत असलेल्या वातानुकूलित लोकलमुळे (एसी) त्या मागील लोकल फेऱ्यांना होणारी प्रचंड गर्दी आणि राज्यातील सत्ताधारी पक्षाचे खासदार श्रीकांत शिंदे आणि विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची मागणी यामुळे मध्य रेल्वेने वातानुकूलित लोकलच्या दहा फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या वातानुकूलित लोकलच्या जागी आज, गुरुवारपासून सामान्य लोकल धावणार आहेत. दरम्यान, बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी बदलापुरातील रेल्वे प्रवाशांनी एसी लोकलविरोधातील आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवला होता.

एसी लोकलमुळे साध्या लोकल फेऱ्या रद्द झाल्याने प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष आहे. त्यामुळे प्रत्येक रेल्वे स्थानकात उग्र आंदोलन होईल, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता. रेल्वे स्थानकातील संभाव्य आंदोलन लक्षात घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सहा दिवसांपूर्वी सुरू केलेल्या वातानुकूलित लोकल फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय बुधवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास रेल्वे प्रशासनाने घेतला.

१९ ऑगस्टपासून १० एसी लोकल फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. प्रवाशांच्या विविध निवेदनांचा विचार करून, या १० लोकल फेऱ्या आज, गुरुवारपासून तात्पुरत्या स्वरूपात रद्द करण्यात येत आहेत. या दहा एसी लोकलच्या जागी सध्याच्या वेळापत्रकानुसार विना वातानुकूलित लोकल चालवण्यात येणार आहेत. एसी सेवा पुन्हा सुरू करण्याची तारीख पुनरावलोकनानंतर कळवली जाईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी बुधवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिलकुमार लाहोटी यांची भेट घेतली. या भेटीत रेल्वे प्रकल्पाचा आढावा घेत सीएसएमटीहून संध्याकाळी ५.२२ला सुटणाऱ्या बदलापूर वातानुकूलित लोकलचा पुनर्विचार करण्याची विनंती महाव्यवस्थापक लाहोटी यांना केली होती.

श्रेय कुणाचे?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सत्ता आल्यानंतर पहिलेच अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनात वातानुकूलित लोकलचा मुद्दा उपस्थित झाला. खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील ट्वीट करीत एसी लोकल बंद करण्याची मागणी केली. दरम्यान, समाज माध्यमांवर बदलापूरमधील शिवसेनेच्या शाखाप्रमुखांच्या समूहामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नामुळे बदलापूर वातानुकूलित लोकल रद्द झाल्याचे सांगत त्यांना धन्यवाद देण्यात आले. यामुळे वातानुकूलित लोकल बंद करण्याचे श्रेय कुणाचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मध्य रेल्वेवरील फेऱ्या (मुख्य, हार्बर, ट्रान्स हार्बर, बेलापूर-उरण)

एकूण लोकल फेऱ्या – १,८१०

वातानुकूलित लोकल फेऱ्या – ५६

अतिरिक्त म्हणून धावणाऱ्या वातानुकूलित फेऱ्या – ३४

साध्या लोकलच्या जागी धावणाऱ्या वातानुकूलित फेऱ्या – २२

बदलापूरमध्ये सविनय कायदेभंग आंदोलन
बदलापूर : नियमित लोकलच्या वेळेत एसी लोकल चालवण्याचा निर्णय आणि आश्वासनांची पूर्तता न केल्या विरोधात बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी बदलापुरातील रेल्वे प्रवाशांनी आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवला होता. संतप्त महिला आणि पुरुष प्रवाशांनी एसी लोकलमधूनच प्रवास करत सविनय कायदेभंग आंदोलन केले. मात्र रेल्वे पोलिसांनी प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केल्यानंतर प्रवाशांनी स्टेशन मास्तर कार्यालयाला घेराव घातला. परिणामी बदलापूर स्थानकातील परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे चित्र पाहायला मिळत होते.

मध्य रेल्वे मार्गावर गेल्या काही दिवसांपासून सुरू करण्यात आलेल्या एसी लोकलविरोधात ठाणे, मुंब्रा या स्थानकांत प्रवाशांनी विरोध दर्शवण्यास सुरुवात केली होती. तोच गेल्या आठवड्यापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून संध्याकाळी ५.२२ वाजता मिनिटांनी सुटणारी सर्वसामान्य बदलापूर लोकल रद्द करून त्याऐवजी एसी लोकल सुरू करण्यात आली होती. मात्र मुंबईहून बदलापूरच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना त्याच कालावधीत बदलापूरची दुसरी लोकल नसल्याने ५.३३ची खोपोली लोकल पकडावी लागत होती. त्यामुळे गर्दीत गुदमरून प्रवास करावा लागणाऱ्या प्रवाशांनी बदलापूर स्थानकावर येऊन तीव्र संताप व्यक्त केला. अखेर तीन दिवसांच्या आंदोलनानंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांसमोर नमते घेत सीएसएमटीहून सुटणारी बदलापूर एसी लोकल रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती स्टेशन मास्तरांनी दिल्यानंतर प्रवाशांनी आंदोलन मागे घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button