Uncategorizedताज्या घडामोडीविदर्भ

मानसिक संतुलन बिघडल्यामुळे कुटुंबापासून दुरावलेला एक तरुण अपघातात जखमी, अपघात झाला अन् चमत्कार घडला

नागपूरः मानसिक संतुलन बिघडल्यामुळे कुटुंबापासून दुरावलेला एक तरुण अपघातात जखमी झाला आणि हा अपघातच त्याच्या घरवापसीला कारणीभूत ठरला.

मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील दुर्गम गावातील रहिवासी राधे इवनाती यांचा मनोरुग्ण मुलगा बालकिशन २०१४ साली एक दिवस रात्री अचानक घरून निघून गेला. त्याच्या कुटुंबीयांनी छिंदवाडा परिसरात त्याचा सर्वत्र शोध घेतला. मात्र तो न सापडल्याने जवळच्या पोलिस स्टेशनला तक्रार करण्यात आली. आज ना उद्या मुलगा परतेल अशी आशा वडिलांना होती. सात वर्षापूर्वी छिंदवाड्यातून निघालेल्या या तरुणाचा यंदा १ एप्रिल रोजी यवतमाळ येथे अपघात झाला. आता तो यवतमाळला कसा पोहचला हे त्यालाच माहिती. अपघातात जखमी झाल्यामुळे काही लोकांनी त्याला यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याच्या पायाचे हाड मोडले होते. त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. त्यामुळे प्रथमोपचारानंतर त्याला नागपूरला मेडिकलमध्ये पाठविण्यात आले. येथे त्याच्या पायावर शस्त्रक्रिया करून त्यात रॉड टाकण्यात आला. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली. उपचारा दरम्यान तो मनोरुग्ण असल्याचे मेडिकलमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यामुळे पाय बरा झाल्यानंतर त्याला मेडिकलच्या मानसोपचार विभागात उपचारासाठी पाठविण्यात आले. तेथील समाजसेवा अधीक्षक व कर्मचारी त्याच्याशी संवाद साधून त्याला बोलते करण्याचा प्रयत्न केला.

वडिलांचा आनंद गगनात मावेना

तरुणाने जी काही त्रोटक माहिती दिली त्या आधारे समाजसेवा विभाग व अजनी पोलिस यांनी त्याच्या कुटुंबाचा शोध सुरू केला. पोलिस निरीक्षक शरीन दुर्गे यांच्या मार्गदर्शनात महिला पोलिस रुकसार शेख यांनी बालकिशनच्या कुटुंबीयांचा पत्ता शोधून काढला. पोलिस ठाण्यातून त्याच्या वडिलांना जेव्हा तुमचा मुलगा सापडला आहे असा फोन गेला त्यावेळी त्यांचा आनंद गगनात न मावणारा होता. खरं तर आम्ही तो जिवंत असण्याची आशाच सोडली होती, पण आज आमचं लेकरू हयात आहे हे ऐकल्यावर झालेला आनंद शब्दात सांगण्यासारखा नाही, अशी त्याच्या वडिलांची भावना होती.

तीन महिने घेतला उपचार

गेली सात वर्षे बालकिशन वेगवेगळ्या गावांमध्ये वेडा म्हणून फिरत होता. तो काय खात होता? कुठे राहता होता? याची कल्पना देखील करवत नाही, आणि एका अचानक घडलेल्या अपघातात त्याला त्याचे घर गवसले. मेडिकलमध्ये तब्बल तीन महिने उपचार घेऊन हसत-हसत वार्डातील डॉक्टर्स, सिस्टर यांचा त्याने नुकताच निरोप घेतला. बालकिशनच्या कुटुंबात आई-वडील आणि लहान भाऊ आहे. विशेष म्हणजे त्याचा भाऊ देखील मनोरुग्ण आहे. बालकिशनच्या उपचाराचा खर्च समाजसेवा विभागामार्फत करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button