breaking-newsTOP NewsUncategorizedगणेशोत्सव-२०२३ताज्या घडामोडी

गणेशोत्सव 2022 : गौरी-गणपती सणाविषयी संपूर्ण विशेष माहिती

पिंपरी-चिंचवड । महान्यूज । प्रतिनिधी ।

भारतीय संस्कृती मधील अत्यंत महत्त्वाचा, उत्साहाला उधाण आणणारा आणि वर्षातून एकदा येणारा हा सण कोणता ?? यंदाच्या गणेशोत्सवावर महाईन्यूजने टाकलेला प्रकाशझोत…

आपली भारतीय संस्कृती विविध सण,संस्कृती, परंपरा यांनी भरलेली आहे. प्रत्येक भागात अनेक सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. वेगवेगळ्या प्रकारे सण साजरे करणे हा संस्कृतीचा भाग आहे. सगळ्या सणांचे खास असे वैशिष्ठ्य आणि महत्त्व आहे.

गौरी गणपती वर्षातून एकदा येतात. साधारण ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान गौरी आणि गणपतीचे आगमन होते. फक्त महाराष्ट्रातच नाही तर जगभरात हा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रासह, कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थान, बिहार, छत्तीसगढ आणि उत्तर प्रदेशात ही हा सण साजरा करतात. त्या त्या भागानुसार पद्धत वेगळी असेल पण उद्देश मात्र एकच असतो

गणपती बाप्पा हा सगळ्यांचाच लाडका आणि ज्ञानाचा अधिष्ठाता आहे. बाप्पाकडे चौदा विद्या आणि चौसष्ठ कला आहेत. बाप्पा म्हणजे कोणतेही संकट दूर करणारा, चांगल्या बुद्धीचा ( सुबुद्धी ) आणि सुविधांचा देव. म्हणूनच तर बाप्पाला कोणत्याही शुभ प्रसंगी / कार्यात पहिला पूजनाचा मान दिला जातो. सर्वांच्या म्हणजे प्रत्येकाच्या देवघरात बाप्पाची सुंदर आणि सुबक मूर्ती असतेच असते.

मोदक प्रिय, उंदीर वाहन असलेला हा बाप्पा येणार म्हटले तरी चेहऱ्यावर आनंद आणि मनात चैतन्य पसरावतो. विद्येचा दाता असणारा बाप्पा येणार म्हणून अनेक ठिकाणी जय्यत तयारी करण्यात येते. ढोल, ताशाच्या गजरात, दिव्यांच्या रोषणाईत, थाटमाटात आपण त्याचे दरवर्षी स्वागत करतो.

आपल्याकडे जेंव्हा आपण सण, उत्सव साजरे करतो तेंव्हा घरात मांगल्याचे, शांततेचे आणि समाधानाचे आणि मन प्रसन्न करणारे वातावरण असते. साक्षात बाप्पा आपल्या घरात असतात तर मग का असे होणार नाही ?? आणि तोच तर मुख्य हेतू असतो. आपले घर शांतता, समृद्धी, ऐश्वर्य आणि समाधान यांनी भरून जावे म्हणूनच तर सण साजरे होतात. याच गणपती बाप्पा सोबत गौराई म्हणजेच शक्तिदेवता आपल्या घरात आगमन करते. गौरी म्हणजे लक्ष्मी, सरस्वती, धनवृद्ध, धनसंपदा तसेच सोन्या नाण्याचे आगमन असे मानले जाते. गौरी म्हणजे पार्वतीचे रूप.

गौरी गणपती उत्सवात गणपती येण्या आधी हरतालिका हे व्रत सुहासिनी आपले सौभाग्य टिकून राहावे यासाठी तसेच कुमारिका पतीबद्दलच्या सर्व मनोकामना पूर्ण करण्यासाठी करतात. यात माता पार्वती आणि भगवान शंकराची पूजा केली जाते. त्यानंतर गणेशाचे आगमन होते. गणपती आल्या नंतर तिसऱ्या दिवशी गौराई आगमन, दुसऱ्या दिवशी पूजन तर तिसऱ्या दिवशी गौरी विसर्जन करण्यात येते. परंपरेनुसार दीड दिवस, तीन दिवस, पाच दिवस, सात दिवस तर दहा दिवस गणपती घरात बसतात.

१. गौरी गणपतीची कोण ??
गौरी ही पार्वतीचे शक्तीरूप मानले जाते आणि पार्वती ही बाप्पाची आई आहे. तर काही ठिकाणी गौराईना बाप्पाची बहीण मानले जाते. भावा सोबत बहीण माहेरी आली असे समजले जाते. माहेरच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासारखे दुसरे सुख नाही त्यामुळे माहेरपण अनुभवायला बाप्पा बहिणीला घेऊन येतो असेही म्हटले जाते. दोन गौराई असतात. एक असते जेष्ठा तर दुसरी कनिष्ठ.

२. सण कसा साजरा केला जातो ??
गौरी गणपती हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो. गणपती काही दिवसांवर असतानाच तयारीची सुरुवात होते. गणपतीच्या आणि गौरीच्या स्वागतासाठी मखर सजवली जाते. तिथे दिव्यांची रोषणाई, फुलांच्या माळा, मातीची खेळणी, काही फळे ठेवण्यात येतात. बरेच लोक काही दिवस आधीच मूर्ती बुक करतात तर काही लोक गणपती आगमन दिवशीच घेऊन येतात.

काही ठिकाणी गणपतीसाठी अनारसा किंवा पेढ्याचा पार भरण्याची पद्धत असते. म्हणजे त्या घरी नवस बोलला गेला असेल तर ११,२१,३३ अशा पेढ्यानी किंवा अनारसे बनवून त्यावर गणपती ठेवून मग पूजा आरती केली जाते आणि मगच गणपती मखरात बसवतात. पेढे आणि अनारसे प्रसाद म्हणून ग्रहण केला जातो. बाप्पासाठी तऱ्हेतऱ्हेचे मोदक, लाडू, पुरणपोळी, गूळ खोबरे, खीर असे नैवेद्य दाखवतात.

३. उंदीर बीज
उंदीर हे गणपतीचे वाहन असल्याने उंदरांना महत्त्व असते. उंदीर बीज हा दिवस उंदरांचा असतो. या दिवशी वेगवेगळ्या कडधान्यांच्या घुगाऱ्या करून शेतात आणि घरात अडगळीच्या ठिकाणी ठेवल्या जातात. जेणेकरून उंदीर ते खाऊ शकतील.

४. गौरी आगमन
या दिवशी पार्वती आपल्या घरी माहेरवाशीण म्हणून येते. त्या दिवशी घरातील स्त्रिया दारात रांगोळी काढून, लक्ष्मीची पावले काढून, ताट आणि चमचा वाजवत गौरीची म्हणजेच लक्ष्मीची मुखवटे घरात आणतात. कशाने आली सोन्याच्या पावलांनी असे म्हणत तिचे आगमन होते. सजवलेल्या मखरात त्यांना बसवण्यात येते. छान दागिने, फुलांचे हार, नव्या साड्या घालून गौराई ल सजवले जाते. हळदी, कुंकू लावून मालावस्त्रे वाहून त्यांची पूजा केली जाते.

५. गौरी पूजन
या दिवशी गौराई जेवतात. त्यासाठी पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. अनेक भागात सोळा भाज्या केल्या जातात. या ही दिवशी पूजा नैवेद्य आरती करण्यात येते.

६. गौरी विसर्जन
तिसरा दिवस म्हणजे विसर्जनाचा दिवस. या दिवशी हळदी कुंकू वाहून मुखवटे हलवले जातात. म्हणजेच गौरी विसर्जन केल्या असे मानले जाते. त्या दिवशी शेजारच्या बायका बोलावून हळदी कुंकू दिले जाते. एकमेकींची गौरीची आरास पाहण्यासाठी सगळे एकमेकांच्या घरी आवर्जून जातात. संध्याकाळी सगळा साज उतरवून ठेवले जाते.

म्हणजेच अनंत चतुर्दशी. परंपरेनुसार जितक्या दिवसाचा गणपती आहे तितके दिवस ठेवून गणपती विसर्जन केले जाते. या दिवशी हळद, कुंकू, अक्षदा, दुर्वा घालून धूप, डीप ओवाळून आरती केली जाते आणि वाजत गाजत मिरवणूक काढून गणपती विसर्जन करण्यात येतो.

7. सप्टेंबरला गणपती विसर्जन होणार आहे
31 ऑगस्ट रोजी, गणपतीच्या स्थापनेनंतर 10 दिवसांनी, 9 सप्टेंबर रोजी, गणपती आपल्या निवासस्थानी परत येतो. या दिवशी लोक ‘गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात गणेश विसर्जन करतात. या दिवशी अनंत चतुर्दशी तिथी राहते. यानंतर १५ दिवसांचा पितृ पक्ष सुरू होतो. पितृ पक्षाच्या काळात पितरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी लोक पिंड दान, तर्पण, श्राद्ध इत्यादी करतात.
गौरी विसर्जन : ५ सप्टेंबर रोजी रात्री ८:५ पर्यंत आहे.
गणेश चतुर्थी : ३१ ऑगस्ट २०२२ रोजी असून
अनंत चतुर्दशी : ९ सप्टेंबर २०२२ आहे. पूर्ण दिवस शुभ आहे.
तर मग जय्यत तयारी करा आणि उत्साहाने गौरी गणपती साजरा करा.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button