breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

येणारे वर्ष आरोग्यदायी होण्यासाठी स्वयंशिस्तीचा निर्धार करा – मुख्यमंत्री

मुंबई – येणारे वर्ष आरोग्यदायी होण्यासाठी स्वयंशिस्तीचा निर्धार करा, असे म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेसाठी एक खास पत्रच लिहिले आहे. या पत्रामध्ये त्यांनी करोनाविरुद्धचा लढा महाराष्ट्र आतापर्यंत कसा लढला हे सांगण्याबरोबरच नवीन वर्षामधील परिस्थितीसंदर्भात भाष्य केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय, ‘कोरोनाला पूर्णपणे हद्दपार करण्याचा आणि त्यासाठी आपल्या वैयक्तिक आरोग्याबरोबर इतरांच्या आरोग्याचीदेखील काळजी घेण्याचा संकल्प आपण नव्या वर्षासाठी करूया. गेले वर्षभर संपूर्ण जग कोरोनाशी लढा देत आहे. महाराष्ट्रानेदेखील लोकांच्या सहभागाने आणि अतिशय जबाबदारीने ही लढाई लढली आहे. आज आपण विविध मार्गांनी कोरोना विषाणूचा संसर्ग काहीसा कमी करीत आणला असला, तरी येणाऱ्या वर्षात बेसावध न राहता आपली व आपल्या कुटुंबीयांच्या आरोग्याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.’

‘एक नवी जीवनपद्धती आपण शिकलो आहोत, यामध्ये मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, हात स्वच्छ ठेवणे यासारख्या त्रिसूत्रीचा अवलंब आपण करत आहोत. वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन शिक्षण यासारख्या बाबतीत तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त नाविन्यपूर्ण उपयोग करीत आहोत.’

‘पुढील काळ कसा असेल याचा अंदाज बांधता येणे अवघड आहे. लस आपल्यापर्यंत येईल आणि ती सर्वांना मिळेल हा एक भाग झाला, पण दरम्यान कोरोना विषाणूच्या बदलत्या रुपामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचाही आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागेल.’

‘आपण पुनश्च: हरी ओम म्हणत सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करीत आहोत. आता आपल्याला मागे परतायचे नाही. कोरोनापासून स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर नियम आणि कायदे यापेक्षा आता स्वयंशिस्त पाळणे याला सर्वोच्च प्राधान्य द्यावे लागेल. विशेषतः नवीन पिढीवर याची जास्त जबाबदारी आहे. नवीन वर्षात आपण जबाबदार नागरिक म्हणून सर्वांच्याच आरोग्याची काळजी घेण्याचा निर्धार मनोमन करणे गरजेचे आहे.’

‘आपली आव्हाने कमी होणार नाहीत. शासन यंत्रणा कृतीशील आणि गतीमान आहे. नैसर्गिक आणि मानवनिर्मित संकटे नेहमीच येतात परंतु त्याचा सामना सावधपणे आणि शिस्तबद्ध पद्दतीने करूया’, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी जनतेला केले आहे.

‘सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीचा अतिशय जिद्दीने सामना करीत असलेल्या डॉक्टर्स, परिचारीका, पोलीस, शासकीय आणि महानगरपालिका कर्मचाऱ्यांना तसेच स्वयंसेवकांना नव वर्षाच्या मन:पूर्वक शुभेच्छा’, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button