ताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

भरतीबरोबर उसळली कचऱ्याची मोठी लाट, मुंबईच्या किनाऱ्यावर वाहून आला तब्बल पाच मेट्रिक टन कचरा

मुंबई : अरबी समुद्रात गेल्या दोन दिवसांपासून मोठी भरती असल्याने समुद्रात ४.३० मीटरपेक्षा जास्त उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. त्यामुळे खवळलेल्या समुद्राच्या पोटातील कचरा बाहेर आला आहे. गेट वे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, गिरगाव व अन्य चौपाटीवरून गुरुवारी संध्याकाळपर्यंत महापालिकेच्या सफाई कामगारांमार्फत पाच मेट्रिक टनपेक्षा जास्त कचरा उचलण्यात आला असून आणखी कचरा उचलण्याचे काम सुरू आहे.

अरबी समुद्रात १५ ते १८ जूनपर्यंत मोठे उधाण आहे. यावेळी समुद्र खवळलेला राहणार असून समुद्रात तब्बल ४.६६ ते ४.८७ मीटरच्या लाटा उसळत आहेत. गुरुवारी १६ जून रोजी दुपारी १ वाजून ३५ मिनिटांनी समुद्राला मोठी भरती होती. यावेळी समुद्रात ४.८७ मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कचरा समुद्र किनाऱ्यावर फेकला गेला. नाल्यांवाटे व अन्य मार्गाने समुद्रात गेलेला कचरा लाटांबरोबर वाहून बाहेर आला होता.

भरतीच्या अंदाजाने पालिकेने गेटवे ऑफ इंडियासह मरीन ड्राइव्ह, गिरगाव, दादर, माहीम, वांद्रे, खार, जुहू, वर्सोवा, मढ, अक्सा या चौपाट्यांवर यंत्रणा सज्ज ठेवली होती. कचरा उचलण्यासाठी पालिकेच्या घनकचरा विभागाचे सफाई कामगार बुधवार रात्रीपासूनच कामाला लागले होते. समुद्राला ओहोटी असताना किनाऱ्यालगतचा कचरा साफ करून तो डम्पिंग ग्राउंडमध्ये हलवण्यात येत आहे, अशी माहिती घनकचरा विभागाकडून देण्यात आली.

यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश

अरबी समुद्रात १८ जूनपर्यंत मोठी भरती असल्यामुळे या काळात शहरात मुसळधार पाऊस पडला तर पाणी तुंबण्याची शक्यता आहे. समुद्रात साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा उसळल्यास व या दरम्यान ५० मिमीपेक्षा अधिक पाऊस कोसळल्यास पावसाचे पाणी समुद्रात जात नाही. परिणामी पाणी तुंबू शकते. गेल्या दोन दिवसात मोठा पाऊस न झाल्यामुळे आपत्ती टळली आहे. शुक्रवार व शनिवारी समुद्राला मोठी भरती असल्यामुळे पालिकेची आपत्कालीन यंत्रणा, पर्जन्य जलवाहिन्या विभाग, एनडीआरएफ, अग्निशमन दल, नौदल, तटरक्षक दलाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

९३ लाइफ गार्ड तैनात

पालिकेने गिरगाव, दादर, माहीम, वांद्रे, जुहू, वर्सोवा, अक्सा या प्रमुख चौपाट्यांवर येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी तब्बल ९३ लाइफ गार्ड तैनात केले आहेत. लाइफ गार्डकडे बचावकार्यासाठी आवश्यक असणारी सर्व प्रकारची साधने उपलब्ध आहेत. तसेच लाइफ गार्डच्या मदतीला रेस्क्यू टीमचे जवान सज्ज आहेत. जेटकीज, सहा रेस्क्यू बोट, सहा कयाक्स, सहा सर्फ बोर्डसह बचावकार्यासाठी आवश्यक असणारी साधनसामग्री देण्यात आली आहे. समुद्र खवळलेला असताना नागरिकांनी चौपाट्यांवर जाऊ नये, असे आवाहन मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख हेमंत परब यांनी केले आहे.

आज, उद्या मोठी भरती

तारीख भरतीची वेळ लाटांची उंची (मीटर)

१७ जून दुपारी २.२५ ४.८०

१८ जून दुपारी ३.१६ ४.६६

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button