‘देशावरील राहु आणि केतूचे ग्रहण लवकरच जाणार’, मोदी-शहांवर सिद्धूंची टिका

सध्याच्या सत्ताधारी पक्षामध्ये कमालीचा अहंकार भरला आहे. जिथे अहंकार येतो तिथे विनाश निश्चित असतो. या सरकारच्या दबावामुळे निवडणूक आयोग, सीबीआय अशा संस्थांची स्वायत्तता धोक्यात आली आहे. मात्र देशावरील राहु आणि केतूचे ग्रहण लवकरच जाणार आहे, अशा शब्दात काँग्रेसचे खासदार नवज्योतसिंग सिद्धू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली. सिद्धू आज पुण्यामध्ये एका पत्रकारपरिषदेमध्ये बोलत होते.
केंद्रातील भाजप सरकारकडून विविध भागात कोणत्याही व्यक्तिने समस्येबद्दल आवाज उठवल्यास भाजपच्या मंत्र्याकडून संवाद साधला जात नाही. हे केवळ दंडातंत्रच्या माध्यमातून संवाद साधत आहेस अशा शब्दात सिद्धू यांनी भाजपवर सडकून टीका केली. सध्या देशामध्ये अन्याय आणि अत्याचाराच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. शेती मालास भाव नाही, तरुण वर्गाला नोकर्या नसल्याने आलेल्या नैराश्यमुळे आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मात्र यासंदर्भात सरकार काही करताना दिसत नसल्याचा आरोपही सिद्धू यांनी केला आहे. ‘नोटाबंदीतून काळा पैसा बाहेर येईल’ असे पंतप्रधान सांगत होते. मात्र अजून तो पैसा बाहेर आला नसून स्विस बँक, जागा आणि सोन्यामध्ये गुंतवला असल्याचे सांगत त्यांनी पंतप्रधानावर निशाणा साधला. याचबरोबर भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्या बँकेत एका दिवसात ७५० कोटी कुठून आले असा सवाल उपस्थित करत ते कोणत्याही रांगेत उभे दिसले नाही अशी टिकाही त्यांनी केली.
‘अण्णा हजारे यांचा सन्मान राखला गेला पाहिजे’
अण्णा हजारे यांचा सन्मान राखला गेला पाहिजे. अण्णांनी आयुष्यभर निस्वार्थ भावनेने देशाची सेवा केली. त्यांना कशाचीही अपेक्षा नाही ते केवळ देशाच्या भल्यासाठी आंदोलन करत आहेत. अशावेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे सिद्धू म्हणाले.
‘विराट जगातील सर्वोत्तम खेळाडू’
विराट कोहली हा खेळाडू नसून एक विद्यापीठ आहे. त्याच्यावर किती ही दडपण टाकले तरी तो चांगल खेळतो. तो जगातील सर्वोत्तम खेळाडू आहे असं विराटबद्दल बोलताना सिद्धू यांनी सांगितले.





