दुष्काळात शेतकऱ्यांकडून कर्जवसुली करू नका; रविकांत तुपकरांचा मायक्रोफायनान्स कंपन्यांना इशारा
“एक वर्ष नफा मिळाला नाही तर कंपन्या मरतात का?” असा सवाल; दुसरीकडे पीक विम्यासाठी नितीन देशमुख आंदोलनाच्या तयारीत

बुलढाणा : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाणा जिल्ह्यातून दुष्काळ संघर्ष यात्रा सुरू केली आहे. या यात्रेच्या पाचव्या दिवशी, १७ नोव्हेंबर रोजी जळगाव जामोद तालुक्यातील सोनगाव येथे झालेल्या सभेत त्यांनी मायक्रोफायनान्स कंपन्या आणि खासगी बँकांकडून शेतकऱ्यांची सुरू असलेल्या कर्जवसुलीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. दुष्काळामुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना बँका आणि वित्तीय कंपन्यांनीही काही काळ तोटा सहन करावा, असे आवाहन त्यांनी केले.
“मायक्रोफायनान्स कंपन्यांनी आणि बँकांनी शेतकऱ्यांच्या जिवावर हजारो कोटी रुपये कमावले. वर्षानुवर्षे नफा मिळवला. आता एक वर्ष दुष्काळ पडला आणि शेतकरी संकटात सापडला, तर तुम्हीही थोडा तोटा सहन करा. एक वर्ष नफा मिळाला नाही तर तुमच्या कंपन्या मरतात का? दुष्काळ सहन करण्याचा ठेका काय फक्त शेतकऱ्यांनीच घेतला आहे का?” असा सवाल तुपकर यांनी उपस्थित केला.
बुलढाण्यात मायक्रोफायनान्स कर्मचाऱ्यांनी काढलेल्या मोर्चावरही त्यांनी भाष्य केले. आपल्यावर अप्रत्यक्ष टीका केली जात असल्याने फरक पडत नसल्याचे सांगत, “अंगावर आलात तर कार्यक्रमच लावून टाकीन,” असा आक्रमक इशाराही त्यांनी दिला.
शेतकरी आणि सैनिकांमुळे देश जिवंत असल्याचे सांगत तुपकर यांनी शेतकरी आणि जवान दोघेही विविध संकटांचा सामना करत असल्याची भावना व्यक्त केली. दुष्काळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता सरकारला आधीपासून माहीत असताना शेतकऱ्यांना संकटाच्या उंबरठ्यावर का आणले, असा सवालही त्यांनी केला. शेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या वतीने ही दुष्काळ संघर्ष यात्रा काढण्यात आली आहे. गावोगावी सभा घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न या यात्रेतून केला जात आहे.
हेही वाचा – गडचिरोलीतील रखडलेले विकासप्रकल्प तातडीने मार्गी लावा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश
पीक विम्यासाठी नितीन देशमुख आंदोलनाच्या तयारीत
दरम्यान, शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळावी आणि नुकसानग्रस्त पिकांची पाहणी व्हावी, या मागण्यांसाठी ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत. यापूर्वी शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत मिळावी, या मागणीसाठी त्यांनी समृद्धी महामार्गावर आंदोलन केले होते.
आता सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम तातडीने मिळावी, तसेच तूर पिकाची पाहणी करून तूर उत्पादक शेतकऱ्यांनाही पीक विम्याचा लाभ द्यावा, अशी त्यांची मागणी आहे. आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढण्यात येणार आहेत. त्यानंतर संपूर्ण विदर्भात शेतकऱ्यांना सोबत घेऊन व्यापक आंदोलन उभारण्याचा इशारा देशमुख यांनी दिला आहे.
दिवाळीसाठी सरकारने जाहीर केलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीपासून अकोला जिल्ह्यातील तब्बल ८२ हजार शेतकरी वंचित असल्याचा दावाही नितीन देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे दुष्काळी मदत, पीक विमा आणि कर्जवसुली या मुद्द्यांवरून विदर्भातील शेतकरी प्रश्न पुन्हा ऐरणीवर आले आहेत.




