Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

तारळी प्रकल्पावरून अदानी कंपनीची वनमंत्र्यांकडे धाव; ५,६७५ कोटींच्या खर्चाबाबत दिले स्पष्टीकरण

वनविभागाने काम थांबवण्याचे दिले होते आदेश; वन्यजीव संवर्धन निधी २२७ कोटींवरून २.२७ कोटींवर आणल्याचा आरोप, कंपनीच्या खुलाशाची पडताळणी होणार

सातारा : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात तारळी नदीच्या खोऱ्यात उभारण्यात येणाऱ्या अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाचे काम वनविभागाने थांबविल्यानंतर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी मंत्रालयात धाव घेतली आहे. बुधवारी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वनमंत्री गणेश नाईक आणि वनविभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय खंदारे यांची भेट घेऊन प्रकल्पाच्या खर्चाबाबत तसेच वन्यजीव संवर्धन निधीबाबत आपली बाजू मांडली.

तारळी पंप्ड स्टोरेज जलविद्युत प्रकल्पाची क्षमता १,५०० मेगावाट असून त्याची अंदाजित किंमत ५,६७५ कोटी रुपये असल्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. मात्र, कंपनीने वनविभागाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात प्रकल्पासाठी आतापर्यंतचा खर्च ५६ कोटी ७५ लाख रुपये असल्याचे नमूद केल्याचा मुद्दा समोर आला. त्यामुळे प्रकल्पाच्या खर्चात मोठी तफावत असल्याचा आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी जमा करावयाच्या वन्यजीव संवर्धन निधीत कपात झाल्याचा आरोप करण्यात आला.

तारळी नदीचे खोरे पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात येत असल्याने प्रकल्पाच्या खर्चाच्या चार टक्के रक्कम सह्याद्री व्याघ्र प्रकल्पासाठी जमा करणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे. ५,६७५ कोटी रुपयांच्या प्रस्तावित खर्चानुसार ही रक्कम सुमारे २२७ कोटी रुपये होते. मात्र, ५६ कोटी ७५ लाख रुपयांच्या खर्चाच्या आधारे ही रक्कम २ कोटी २७ लाख रुपयांवर आल्याचा आरोप आहे.

हेही वाचा –  गडचिरोलीतील रखडलेले विकासप्रकल्प तातडीने मार्गी लावा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

या प्रकरणी राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची आवश्यक पूर्वपरवानगी न घेताच काम सुरू केल्याचा ठपका ठेवत पाटण वनविभागाने १३ नोव्हेंबर रोजी कंपनीच्या अधिकृत स्वाक्षरीदाराला नोटीस बजावली होती. तसेच प्रकल्पाचे काम तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले होते. प्रकल्पाच्या एकूण खर्चातील तफावत आणि वन्यजीव संवर्धनासाठी जमा करण्यात आलेल्या निधीबाबत स्पष्टीकरण देण्यासही सांगण्यात आले होते.

दरम्यान, वनमंत्री गणेश नाईक यांच्यासमोर बाजू मांडताना कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आतापर्यंत प्रकल्पावर प्रत्यक्षात केवळ ५६ कोटी ७५ लाख रुपये खर्च झाल्याचे सांगितले. उर्वरित रक्कम ही प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकाम खर्चाचा भाग नसून तपासणी आणि तांत्रिक अभ्यासासाठी भरलेली असल्याचे स्पष्टीकरण कंपनीकडून देण्यात आल्याची माहिती आहे.

आता अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने दिलेल्या स्पष्टीकरणाची वनविभागाकडून पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतरच तारळी प्रकल्पाबाबत पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे समजते. त्यामुळे या प्रकल्पाचे काम पुन्हा कधी सुरू होणार, याकडे लक्ष लागले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group