पिंपरी-चिंचवडच्या शिरपेचात मानाचा तुरा! अॅड. संजय दातीर पाटील यांची महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलच्या शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदी निवड
वकिली क्षेत्रातील ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेचा गौरव; न्यायव्यवस्था, वकील संघटना आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवडच्या विधी क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरणारी निवड झाली आहे. पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. संजय भाऊसाहेब दातीर पाटील यांची बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या अत्यंत महत्त्वाच्या शिस्तपालन समितीच्या (डिसिप्लिनरी कमिटी) अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तब्बल ३३ वर्षांच्या प्रदीर्घ वकिली कारकिर्दीत न्यायव्यवस्था, वकील संघटनांचे सक्षमीकरण आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची ही पावती मानली जात आहे. त्यांच्या निवडीमुळे पिंपरी-चिंचवडच्या वकील वर्गात आनंदाचे वातावरण असून, विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अॅड. संजय दातीर पाटील यांनी सन १९९४ मध्ये महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिलकडून वकिलीची सनद प्राप्त करून आपल्या विधी कारकिर्दीला सुरुवात केली. कायद्याचा सखोल अभ्यास, न्यायालयीन कामकाजातील अनुभव आणि वकील वर्गाच्या प्रश्नांबाबत असलेली संवेदनशीलता यांच्या जोरावर त्यांनी विधी क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सन १९९६-९७ मध्ये पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट बार असोसिएशनचे उपाध्यक्ष, तर सन २००६-०७ मध्ये अध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली. या काळात वकिलांच्या विविध प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि संघटनेची ताकद वाढविण्यासाठी त्यांनी सातत्याने पुढाकार घेतला.
वकिली व्यवसायाबरोबरच त्यांनी विविध संस्थांमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. बार कौन्सिलच्या निवडणूक समितीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सन २००५ पासून ते नोटरी म्हणून कार्यरत असून, बँका आणि पतसंस्थांना कायदेशीर सल्लागार म्हणून सुमारे तीन दशकांपासून सेवा देत आहेत. पिंपरी न्यायालयातील विविध प्रकरणांमध्ये त्यांनी प्रभावीपणे न्यायालयीन कामकाज केले आहे.
सध्या ते पिंपरी-चिंचवड अॅडव्होकेट सोसायटीचे सचिव म्हणून कार्यरत आहेत. तसेच पुणे लॉयर्स कन्झ्युमर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडचे तज्ज्ञ संचालक सदस्य म्हणूनही त्यांनी योगदान दिले आहे. विधी क्षेत्राबरोबरच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली आहे.
कोरोना महामारीच्या संकटकाळात वकील वर्गासह गरजू नागरिकांच्या मदतीसाठी त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय ठरले. अडचणीत सापडलेल्या वकिलांना आधार देण्याबरोबरच सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी विविध उपक्रमांत सहभाग घेतला. पिंपरी-चिंचवड न्यायालयीन इमारतीच्या बांधकाम समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी न्यायालयीन पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
हेही वाचा – कांदिवली स्थानकात AK-47 घेऊन पाकिस्तानी दहशतवादी आल्याचा AI व्हिडीओ बनावट; अज्ञात व्यक्तींविरोधात FIR
शिस्तपालन समितीच्या अध्यक्षपदामुळे जबाबदारीत मोठी वाढ
बार कौन्सिलची शिस्तपालन समिती ही वकिली व्यवसायातील व्यावसायिक आचारसंहिता आणि शिस्तीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. वकिलांविरोधातील व्यावसायिक गैरवर्तनाच्या तक्रारींची कायदेशीर चौकटीत सुनावणी करून योग्य निर्णय घेण्याची जबाबदारी या समितीवर असते. त्यामुळे या समितीच्या अध्यक्षपदासाठी कायद्याचे सखोल ज्ञान, प्रदीर्घ अनुभव, निष्पक्ष दृष्टिकोन आणि न्यायव्यवस्थेप्रती निष्ठा या बाबींना विशेष महत्त्व असते. अॅड. दातीर पाटील यांच्या नियुक्तीमुळे त्यांच्या अनुभवाचा आणि संघटनात्मक नेतृत्वाचा या महत्त्वाच्या जबाबदारीत उपयोग होणार आहे.
पिंपरी-चिंचवडच्या विधी क्षेत्राचा सन्मान!
पिंपरी-चिंचवडमधील न्यायालयीन सुविधा, वकिलांचे प्रश्न आणि संघटनात्मक विकासासाठी सातत्याने कार्यरत राहिलेल्या अॅड. संजय दातीर पाटील यांना राज्यस्तरीय महत्त्वाची जबाबदारी मिळाल्याने स्थानिक विधी क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या नियुक्तीचे वकील संघटना, सामाजिक संस्था, सहकारी क्षेत्रातील मान्यवर आणि विविध क्षेत्रांतील नागरिकांकडून स्वागत होत आहे.
वकिली व्यवसायातील प्रदीर्घ अनुभव, संघटनात्मक नेतृत्व आणि सामाजिक बांधिलकीच्या जोरावर अॅड. संजय दातीर पाटील यांनी मिळवलेले हे यश पिंपरी-चिंचवडच्या विधी क्षेत्रासाठी गौरवास्पद ठरले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.




